Gold Price Today : आत्तापर्यंत तब्बल 8800 रुपयांनी स्वस्त झालं सोने; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. पण आज (मंगळवार) सोने-चांदीच्या दरात तेजी दिसली. आज ‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’वर सोन्या भाव 198 रुपयांनी वाढला असून, आता सोन्याचा प्रतितोळा दर 47,439 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच चांदी 634 रुपयांच्या तेजीसह 70,763 प्रतिकिलोवर गेली आहे.

सध्या राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,400 रुपयांवर पोहोचला आहे. ‘ऑल टाईम हाय’ होणाऱ्या सोन्याचा दर आत्तापर्यंत तब्बल 8,800 रुपयांनी कमी झाला आहे. यापूर्वी सोन्याला चांगलाच ‘भाव’ आला होता. त्यावेळी सोन्याचा दर 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. पण आता सोन्यासह चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, चांदी 7300 रुपये स्वस्त झाली आहे.

याबाबत एचडीएफसीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले, की जागतिक बाजारात सोन्याची किंमत आणि रुपयाचे मूल्य सुधारत आहे. त्यामुळे दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 19 रुपयांची घसरण झाली आहे.

असे आहेत दिल्ली सराफा बाजारातील सोन्याचे भाव
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात 19 रुपयांची किरकोळ घसरण झाली. राजधानी दिल्लीत 99.9 शुद्ध असलेल्या सोन्याचा भाव 46,826 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर सोमवारी चादीचे दरही मोठ्या प्रमाणात वधारले आहे. पण आता यामध्ये 646 रुपयांची वाढ झाली असून, चांदी 69,072 रुपये प्रतिकिलो झाली आहे.