सोन्या-चांदीच्या दरात कमालीची ‘तेजी’, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोन्या-चांदीच्या दरात फेब्रुवारीपासून मोठी तेजी पहायला मिळत आहे. आतातर सोनं खरेदी करणं देखील आवाक्याबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गणपतीच्या आगमनापूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत.15 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत जवळपास सोन्याच्या दरात आठ हजार रुपयांनी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी बाजार उघडताच 24 कॅरेट 1 तोळे सोन्याची किंमत 55 हजार 020 रुपये एवढी आहे.

सोमवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला नवी झळाळी मिळाली आहे. वायदा बाजारात 0.42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर चांदीचे दरानं पंचाहत्तरी गाठली आहे. सोमवारी वायदा बाजार चांदीचे भाव 960 रुपयांनी वाढले असून चांदी 75 हजार 120 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली आहे. येत्या काळात सोन्याचे दर आणखीन वाढणार असून प्रति ग्रॅमसाठी 70 ते 75 हजार रुपये मोजावे लागू शकतात असा अंदाज आहे.

मुंबईतील सोन्याचे दर
15 जुलै – 50,850
20 जुलै – 50,935
24 जुलै – 52,835
29 जुलै – 55,040
3 ऑगस्ट – 55,900
7 ऑगस्ट – 58,015

सोन्याचे दर का वाढले ?
कोरोनामुळे 24 कॅरेट सोन्यात गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये उसळी आल्याने त्याचा परिणाम देशातील सोन्याच्या किमतीवर झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना पहायला मिळत आहे.