राज्यात दिवाळीत सोने-चांदीची तब्बल 2 हजार कोटींची उलाढाल; एकट्या ‘सुवर्णनगरी’ जळगावात 70 कोटींची खरेदी

मुंबई/जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळीत धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन तसेच पाडवा व भाऊबीज या सर्व मुहूर्तावर यंदा मोठ्या प्रमाणात सोने-चांदीला मागणी असल्याचे दिसून आले. या काळात राज्यात दोन हजार कोटींची (gold-and-silver-turnover-state-around-rs-2000-crore-diwali) , तर एकट्या सुवर्णनगरी जळगावात 70 कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. देशभरात जळगावातील सोने प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे नेहमीच सोने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

नवरात्रीपासून सुवर्ण पेढ्या गजबजून गेल्या होत्या. तेव्हापासून अद्यापही गर्दी कायम आहे. धनत्रयोदशीला सोने खरेदीस वेग आला. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मोठी खरेदी झाली. पुन्हा पाडवा व भाऊबीजेला खरेदीत आणखी भर पडली. लक्ष्मीपूजनापेक्षा पाडव्याला सोने खरेदीला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेवढी गर्दी झाली, त्यापेक्षा अधिक गर्दी पाडव्याला दिसून आली.

सोन्याचा भाव गेला 51 हजारांच्या वर
जळगावातील 150 च्यावर सुवर्णपेढ्यांमध्ये दिवाळीत 70 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. धनत्रयोदशीला सोन्याचे भाव 51 हजार 100 रुपये प्रतितोळ्यावर होते. हा मुहूर्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले व लक्ष्मीपूजनाला ते 51 हजार 500 तोळ्यावर पोहाेचले आहे. चांदीचेही भाव धनत्रयोदशीला 63 हजार 500 रुपयांवर होते. ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 64 हजार 500 रुपये प्रतिकिलोवर आले. त्यानंतर पाडवा व भाऊबीजेला याच भावावर खरेदी झाली. राज्यात जवळपास दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल केवळ सोने-चांदीत झाल्याचा अंदाज आहे.

गुंतवणूकदारांची दिवाळी
कोरोनावरील प्रतिबंधक लशीच्या मात्रा 95 टक्के लोकांवर यशस्वी ठरल्याचे मॉडर्ना या अमेरिकी कंपनीने जाहीर करताच जगभरातील भांडवली बाजारांनी घेतलेल्या उसळीचे प्रतिबिंब मुंबई भांडवली बाजारातही उमटले. दीपावलीच्या सुट्टीनंतर मंगळवारी बाजारातील व्यवहार सुरू होताच निर्देशांकाने मोठी झेप घेत 44 हजारांचा टप्पा पार केला. 44,161.16 ही तेजीची उंची गाठल्यानंतर निर्देशांक दुपारी 43,952.71 अंकांवर स्थिरावला. मंगळवारी एकूण 314.73 अंकांनी निर्देशांक वधारला आहे.

दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांची वाढलेली क्रयशक्ती, देशात घटत असलेली कोरोनारुग्णांची संख्या आणि पूर्वपदावर येत असलेली जागतिक बाजारपेठ अशी सर्व अनुकूल परिस्थिती असताना मॉडर्नाच्या गुडन्यूजमुळे मंगळवारी भांडवली बाजारात चैतन्य संचारले.

निर्देशांकाने 43, 638 ही आपली आधीची पातळी सोडून 44,161.16 ही नवी उच्चांकी पातळी गाठली आहे. धातू, औद्योगिक, बँकिंग व वित्त क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना जादा मागणी आली. टाटा स्टीलचे समभाग सहा टक्क्यांनी वधारले. दिवसअखेरीस निर्देशांक 43,952.71 अंकांवर स्थिरावला आहे.

दरम्यान, निफ्टीनेही 12, 934 हा नवा उच्चांक गाठला. बाजारातील व्यवहार बंद होतेवेळी 12, 847.20 अंकांवर निर्देशांक स्थिरावला. निफ्टी निर्देशांकात 93.95 अंकांची वाढ नोंदवली गेली.