घराचा पाया खोदताना सापडले सोन्याच्या नाण्यांनी भरलेले घडे

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावात घर बांधण्यासाठी पाया खोदत असताना सोन्याच्या नाण्यांनी भरलेले दोन घडे सापडल्याची घटना घडली आहे. ही घटना दोन महिन्यानंतर उघडकीस आली. पोलीसांनी घडे जप्त केले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती, थाळनेर गावातील बुधा मराठे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मिळाले आहे. घर बांधण्यासाठी पाय खोदण्याचे काम सुरु होते. बांधकाम जलद गतीने होण्यासाठी पाया खोदण्याचे काम मजूरांना दिले होते. खोदकाम सुरु असताना मजूर राकेश सुभाष सावळे व दिलीप दशरथ भोई यांना सोन्याने भरलेले घडे असल्याचे दिसले. ते घडे हडपण्याचा त्यांनी विचार केला. दिवसा घडे काढणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर मजुरांनी मराठे यांना आम्ही उद्या येतो असे सांगितले. दुसऱ्या दिवशी मराठे काम पाहण्यासाठी गेले असता त्यांनी मातिने माखलेले घडे मजुरांनी उचलून नेताना पाहिले. त्यानंतर सावळे यांच्यावर ५० – ६० लाखांची देवाण घेवाण करण्याचा आरोप करत सर्व दागिने जप्त करुन सरकारी खजिन्यात जमा करावे अशी मागणी करत मराठे यांनी थाळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

पोलीसांनी विचारपूस करण्यासाठी राकेश सावळे याला ताब्यात घेतले. यावेळी सावळे यांनी दोन रिकामे घडे पोलीसांना दिले. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.