सोन्याच्या दागिन्यांसंबंधी नवीन नियम आता 1 जूनपासून होणार नाही लागू; जाणून घ्या सरकारने का घेतला निर्णय, ग्राहकांवर होणार कोणता परिणाम

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत सोन्याच्या ज्वेलरीवर हॉलमार्किंगचा नियम लागू होण्याची तारीख वाढवली आहे. देशात 1 जूनला नव्हे तर 15 जूनपासून हॉलमार्किंगचे नियम लागू होतील. सोप्या शब्दात सांगाचे तर 15 जूनपासून देशात केवळ हॉलमार्कचीच ज्वेलरी विकली जाईल. हॉलमार्किंग 1 जूनपासून अनिवार्य होणार होते. एक्सपर्टचे म्हणणे आहे की, देशात कोरोनाची दुसरी लाट पहाता याची लागू होण्याची तारीख वाढवण्यात आली आहे.

हॉलमार्किंग म्हणजे काय
हॉलमार्किंग सोने, चांदी आणि प्लॅटिनमची शुद्धता प्रमाणित करण्याचे माध्यम आहे. होय, सरळ भाषेत सांगायचे तर हे विश्वसनियता प्रदान करण्याचे माध्यम आहे.

हॉलमार्किंगची प्रक्रिया संपूर्ण देशात असलेल्या हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते आणि याची देखरेख भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) द्वारे केली जाते. जर दागिन्यांवर हॉलमार्क आहे तर त्याचा अर्थ त्याची शुद्धता प्रमाणित आहे.

बीआयएसचा हॉलमार्क सोन्यासह चांदीची शुद्धता प्रमाणित करण्याचे माध्यम आहे. बीआयएसचे हे चिन्ह प्रमाणित करते की, दागिना भारतीय मानक ब्यूरोच्या स्टँडर्डनुसार आहे. यासाठी, सोने खरेदी करण्यापूर्वी दागिन्यांवर बीआयएस हॉलमार्क पाहून घ्या. जर सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर याचा अर्थ त्याची शुद्धता प्रमाणित आहे. अनेक ज्वेलर्स तपासणी प्रक्रिया पूर्ण न करताच हॉलमार्क लावतात.

अशावेळी हे पाहणे आवश्यक आहे की हॉलमार्क ओरिजनल आहे किंवा नाही. खर्‍या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्यूरोची त्रिकोणी निशाणी असते. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धता लिहिलेली असते. त्यामध्ये ज्वेलरी निर्मितीचे वर्ष आणि उत्पादकाचा लोगोसुद्धा असतो.

देशभरात अनिवार्य हॉलमार्किंग लागू करण्याची तारीख कोरोनामुळे 1 जूनवरून पुन्हा एकदा वाढवून 15 जून केली आहे. एक्सपर्टचे म्हणणे आहे की, देशभरात बहुतांश भागात ग्राहकांना 22 कॅरेटऐवजी 21 कॅरेट सोने विकले जाते. मात्र, ज्वेलरीचा दर 22 कॅरेट किंवा 24 कॅरेटचा असतो.