भारतात सोन्याची मागणी घटली, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याच्या मागणीत घट दिसून येत आहे. एप्रिल ते जानेवारी दरम्यान या चालू आर्थिक वर्षात सोन्याची आयात जवळपास ९ टक्क्यांनी घसरली आहे. ही आयात तब्बल २४.६४ अब्ज डॉलर म्हणजेच १.७४ लाख कोटी इतक्या रुपयांपर्यंत घसरली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार या आधीच्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०१८-१९ मध्ये २७ अब्ज डॉलरची आयात करण्यात आली होती.

समोर आलेल्या माहीतीनुसार सोन्याच्या कमी आयातीमुळे देशातील व्यापारी तूट (Trade deficit) देखील कमी झाली आहे. एप्रिल-जानेवारी दरम्यान ही व्यापारी तूट १३३.२७ अब्ज डॉलर होती तर एकवर्ष आधी १६३.२७ अब्ज डॉलर इतकी होती. गेल्यावर्षीच्या म्हणजेच जुलै २०१९ या महिन्यापासून सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात घटली आहे. गेल्याच वर्षी सोन्याची आयात ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये वाढली होती. मात्र डिसेंबरमध्ये पुन्हा ४ टक्क्यांनी घसरली तर जानेवारीमध्ये ३१.५ टक्क्यांनी घट झाली.

भारतात दागिने घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात केली जात असते. साधारण ८०० ते ९०० टन सोनं भारत देशात आयात होत असतं. सध्या सरकारने सोन्यावरील आयात शुल्क हे १० टक्क्यांनी वाढवून १२.५ टक्के इतक्या प्रमाणात वाढवलं आहे. दरम्यान उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी दावा केला आहे की, या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या कंपन्या आयात दर वाढवल्यामुळे शेजारच्या देशात आपलं उत्पादन वाढवत आहेत. एप्रिल ते जानेवारी या चालू आर्थिक वर्षाच्या दरम्यान दागिन्यांची निर्यात ही १.४५ टक्क्यांनी घसरून २५.११ अब्ज डॉलरवर गेली आहे. तर देशाची २०१८-१९ मध्ये सोन्याची आयात सुमारे ३ टक्क्यांनी घसरून ३२.८ अब्ज डॉलरवर गेली आहे.