Pune News : हौसेला मोल नाही..! मुलाच्या लग्नासाठी छापली अर्ध्या तोळ्याची लग्नपत्रिका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – हौसेला मोल नाही असे म्हटले जाते. याचीच प्रचिती पिंपरी-चिंचवड शहरात आली आहे. पिंपरी चिंचवडकरांसाठी सोनं हा प्रतिष्ठेचा विषय असून थेरगाव येथील एका सधन शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या लग्नासाठी चक्क सोन्याच्या लग्नपत्रिका छापल्या आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये या शाही लग्नाची आणि छापण्यात आलेल्या लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा आहे.

थेरगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी नारायण नागुभाऊ बारणे यांनी आपल्या लाडक्या मुलाच्या लग्नाची पत्रिका सोन्याची छापली असून अशा 25 लग्नपत्रिका त्यांनी छापल्या आहेत. यासाठी त्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला आहे. एक लग्नपत्रिका अर्ध्या तोळ्याची आहे. छापील अक्षरे सोडल्यास संपूर्ण पत्रिका सोन्याची आहे. ती अ‍ॅम्बॉस पेटींगमध्ये तयार करण्यात आली आहे. प्रत्येक पत्रिकेला 30 हजार रुपये खर्च आला आहे.

नारायण बारणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित बराणे यांच्या विवाह सोहळ्याची ही लग्न पत्रिका आहे. नांदेड सिटीतील जीवन भानुदास लगड यांची ज्येष्ठ कन्या वैष्णवी हिच्यासोबत रोहित याचा विवाह होणार आहे. रोहित आणि वैष्णवी हे दोघे अभियंता आहेत. या लग्न सोहळ्याला घरातील दोनशे मंडळी उपस्थित राहणार असून यावेळी सोशल डिस्टन्सचे नियम पाळण्यासाठी स्थानिक मंडळी आणि आप्तेष्टांची हजेरी राहणार नाही.

रोहित बारणे हे नगरसेविका माया बारणे यांचे पुतणे आहेत. कुटुंबाचा राजकीय वारसा आहे. संतोष बारणे यांचा भाचा बंटी गुजर हा गोल्डन मॅन म्हणून ओळखला जातो. ही लग्न पत्रिका आमदार, खासदार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात येणार आहे. एक पत्रिका बारणे यांनी घरातील देवाच्या गाभाऱ्यात ठेवली आहे.

याबाबत बोलताना बारणे म्हणतात, बऱ्याचदा लग्नातील पत्रिका फेकून दिली जाते. त्यामुळे त्याचे मूल्य शून्य होते. आमच्या कुटुंबियांची ही लग्न पत्रिका प्रत्येकाच्या घरात व स्मरणात राहणार आहे. याची फ्रेम बनवण्यात आल्याने ती योग्य पद्धतीने जतन केली जाणार आहे. याशिवाय कोरोनामुळे या लग्न सोहळ्यावर बंधन आल्याने हा सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थिती पार पडणार असला तरी सोन्याच्या पत्रिकेमुळे हा लग्न सोहळा प्रत्येकाच्या स्मरणात राहणार आहे.