देशाला मिळवून दिलं होतं सुवर्ण पदक, आता आंतरराष्ट्रीय खेळाडूवर भाजी विकण्याची वेळ, जाणून घ्या स्टोरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  रांचीच्या अरगोडा चौक जवळ राहणाऱ्या अमरदीप कुमारने आंतरराष्ट्रीय थ्रो-बॉल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. देश व राज्याचे नाव उज्वल केले. छोट्याशा खेड्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणे अमरदीप आणि त्याच्या कुटुंबासाठी कोणत्याही प्रकारे सोपे नव्हते. पण कोरोना काळात देशातील हा खेळाडू भाजी विकून आपल्या कुटूंबाचे पालनपोषण करण्यास भाग पडत आहे.

२०१७ मध्ये अमरदीप नेपाळमध्ये एक स्पर्धा खेळण्यासाठी जाणार होता. पण त्याच्याकडे पैसे नव्हते. यासाठी अमरदीपची आई कलावती यांना त्यांच्या सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवाव्या लागल्या होत्या. मुलाने आईचे हे बलिदान व्यर्थ जाऊ दिले नाही. सात देशांच्या त्या स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.

२०२० मध्ये अमेरिकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय थ्रो बॉल चँपियनशिपमध्ये अमरदीप भाग घेणार होता. पण कोरोनामुळे ती चॅम्पियनशिप रद्द करावी लागली. अमरदीप घरी सराव करतो आणि घरातील खर्च भागवण्यासाठी भाजी विकत आहे, ज्यामुळे तो त्याच्या आई-वडिलांना काही तरी मदत करू शकेल.

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या अमरदीपला यावेळी सर्वात जास्त मदतीची गरज आहे. परंतु सरकार आणि क्रीडा प्रशासन त्याला मदत करण्यास तयार नाही. अमरदीपचे म्हणणे आहे की, या कठीण काळात भाजी विकण्यासोबतच त्याला कार चालवावी लागत आहे, यामुळे त्याला अभ्यास आणि सराव यावर योग्यरित्या लक्ष केंद्रित करता येत नाही.

आई-वडिलांना आपला मुलगा अमरदीपकडून खूप अपेक्षा आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाचे भविष्य खराब होताना त्यांना पाहायचे नाही. अमरदीपच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलाने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे व राज्याचे नाव उज्वल केले आहे. परंतु असे असूनही या कठीण काळात त्याची काळजी घेण्यास कोणीही नाही.