Gold Price Today : सन 2021 च्या सुरूवातीलाच 42 हजारावर येऊ शकतं सोनं, जाणून घ्या कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या किमतीने उच्चंक गाठला होता. मात्र आता हे दर पुन्हा घसरू लागले आहेत. नोव्हेंबरमध्ये सोने चार हजार रुपयांनी घटले. ऑगस्टपासून सोन्याच्या दरात आठ हजार रुपयांची घसरण झाली आहे. आता आणखी एक चांगली बातमी समोर येत असून सोन्याच्या किमतीबाबत भारतीय बाजारात चांगले संकेत मिळत आहेत. वर्ष संपायला महिना उरला असताना पुढील दोन महिन्यांत सोन्याच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढील वर्षीच्या सुरुवातीला सोन्याच्या दारात मोठी घसरण होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. जानेवारीमध्ये हा दर ४२ हजार प्रति १० ग्रॅम होण्याची शक्यता आहे. दर घसरणीमागे अनेक करणे आहेत मात्र त्यातील प्रमुख कारण म्हणजे कोरोना आणि त्याला रोखण्यासाठी बनविण्यात येत असलेली लस हे आहे.

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आला, त्यांनंतरच्या कालावधीत सोन्यावर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. भारतात ऑक्टोबर, नोव्हेंबर हा महिना सण, उत्सवांचा होता. यामुळे सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता होती. मात्र, लॉकडाऊन आणि कोलमडलेली अर्थव्यवस्था यामुळे खरेदीदारांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली. यामुळे सोन्याच्या दरामध्ये घसरण होऊ लागली. नोव्हेंबरमध्ये सोने २हजार ६०० रुपयांहून स्वस्त झाले आहे. तर उच्चतम स्तरावरून सोने ४ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे.

ऑगस्टमध्ये सोने ५६३७९ रुपयांवर गेले होते. त्यामुळे दरात आणखी वाढ होईल अशी अपेक्षा होती. मात्र, हि आशा मावळली. कारणही तसंच आहे, कोरोनाची लस संपूर्ण जग शोधात आहे. त्यातच रशियाने स्तुतनिक व्ही कोरोना लस आणली त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला. या आठवड्यात सोन्याचा ४ डिसेंबरचा वायदा भाव ४८१०६ प्रति १० ग्रॅमवर आला. शेवटच्या दिवशी सोन्यामध्ये ४११ रुपयांची घट नोंदविली गेली. गुरुवारी सोने ४८ हजार ५१७ रुपयांच्या स्तरावर बंद झाले. हा दर सोन्याच्या उच्च पातळीपेक्षा ८ हजार २०० रुपयांनी कमी आहे. नोव्हेंबर महिन्याचा विचार करता ३० ऑक्टोबरला सोन्याचा दर ५० हजार ६९९ रुपये प्रति १० ग्रॅम होता. मात्र, ९ नोव्हेंबरला तो वाढून ५२ हजार १६७ रुपये झाला होता. यानंतर तो कमी जास्त होत राहिला आणि २७ नोव्हेंबरला ४८ हजार १०६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता. ६ नोव्हेंबरचा विचार करता सोन्याच्या दरात ४हजार रुपयांची घट झाली आहे.

दरम्यान रशियानंतर , अमेरिका, भारत या देशांच्या कोरोना लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे गुंतवणूकदार आता सोन्यातून पैसा काढून घेऊ लागल्याने सोन्याचा दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीत कोरोना लसीचा पहिला टप्पा वितरण आणि लसीकरण होण्य़ाची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे दर हे ४२ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर चांदीच्या दरातही घट दिसण्याची शक्यता असे तज्ज्ञांनी सांगितले

You might also like