खुशखबर ! सोन्याच्या दरात 7 वर्षांमधील सर्वात मोठी घसरण

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना विषाणूच्या लसविषयी सतत सकारात्मक बातम्यांमुळे जगभरातील शेअर बाजारामध्ये खरेदीचे प्रमाण परतले आहे. यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती 5 टक्क्यांहून अधिक खाली आल्या आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होऊ शकते. सध्याच्या पातळीपेक्षा किंमती 5 ते 8 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारामध्ये सोन्याचे दर 1,317 रुपये प्रति दहा ग्रॅमने स्वस्त झाले. त्याच वेळी, एक किलोग्रॅम चांदीची किंमत 2,943 रुपयांनी कमी झाली.

असे काय झाले, ज्यामुळे सोन्याच्या किमती घसरल्या

अमेरिकन शेअर बाजारामध्ये मंगळवारी रात्री खरेदी दिसून आली. ज्यामुळे गुंतवणूकदारांचा कल आता शेअर बाजाराकडे वळला आहे. कोरोना लसीच्या बातम्यांचा बाजारात सकारात्मक परिणाम झाला. अमेरिकन शेअर बाजाराचा अग्रणी बेंचमार्क इंडेक्स S&P 500 नवीन विक्रमी पातळीच्या अगदी जवळ पोहोचला.

आता काय होईल

तज्ञ सांगतात की सोने बर्‍याचदा कठीण काळात चमकते. 1970 च्या मंदीच्या काळात सोन्याच्या किंमती नवीन शिखरावर पोहोचल्या. यानंतर 2008 च्या आर्थिक मंदीमध्ये असाच एक टप्पा दिसला. आकडेवारीवर नजर टाकल्यास, 80 च्या दशकात सोन्याचे भाव सात पटीपेक्षा जास्त वाढून 850 डॉलर प्रति औंसच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते. हे 2008 च्या जागतिक आर्थिक संकटानंतर पुन्हा वाढले, जे 2011 मध्ये 1900 डॉलरच्या पुढे गेले. परंतु नंतर ते बरेच खाली आले होते. म्हणूनच आता असा विश्वास आहे की कोरोनाची लस आली आणि ती पूर्णपणे यशस्वी ठरली तर सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण होईल.

आता भारतातही सोनं स्वस्त होईल का?

तज्ञ म्हणतात की जसजशी कोरोना लसीची बातमी येत जाईल तशा प्रमाणे सोन्याच्या किंमतींवर दबाव वाढत जाईल. सद्यस्थितीत सोन्याच्या किंमतीत 5-8 टक्क्यांनी घसरण पहायला मिळू शकते.