सोन्याला उच्चांकीची ‘झळाळी’, 50 हजार पार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ऐन लग्न सराईच्या हंगामामध्ये सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला असून मुंबईत प्रति तोळा सोन्यासाठी आता 50 हजार 282 रुपये मोजावे लागणार आहेत. यासाठी जीएसटी जवळपास 1500 रुपयांच्या आसपास भरावी लागणार असल्याने नागरिकांना प्रति तोळ्यासाठी 51 हजार 782 रुपये इतकी मोठी रक्कम द्यावी लागणार आहे. या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून सोन्याचे दर दसऱ्यापर्यंत 55 ते 56 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता मुंबई ज्वेलर्स असोसिएशनकडून वर्तवण्यात येत आहे.

सोमवारी जीएसटी सोडून सोन्याचा 10 ग्रॅमसाठीचा दर 48886 रुपये होता. यामध्ये आज जवळपास 1400 रुपयांची वाढ होऊन सोन्याचा दर 50 हजार 282 इतका झाला. यासोबतच जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी चांदी देखील 50 हजारांच्या वर गेली आहे. आणि आज दुसऱ्या दिवशी सोनं देखील 50 हजारांच्या वर गेले आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरात मंदीचे सावट असून अशात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडं पाहिलं जात आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत 8 वर्षाच्या विक्रमी पातळीच्या आसपास जाण्याची किमया केली आहे.

मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले की, ही वाढ होणं अपेक्षित होतं. यामध्ये दसऱ्यापर्यंत आणखी वाढ होईल त्यावेळी सोन्याचे दर प्रतितोळा 55 ते 56 हजारांच्या आसपास असू शकतील. सध्या सोन्याचा आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सोनं 1700 ते 1800 डॉलर पार करून पुढे गेले आहे. लॉकडाऊनच्या आधी सोनं 1250 च्या आसपास होतं. मात्र आता लॉकडाऊनचा परिणाम सोन्यावर होताना दिसत आहे. भारतीय बाजाराचा विचार करता सोनं 38 हजार ते 40 हजारांच्या आसपास होते. परंतु आज अखेर त्यात 10 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे

सोन्याच्या दरात वाढ होण्यामागे देशात सध्या असलेली कोरोना महामारीची साथ हे प्रमुख कारण आहे. या महामारीमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर सोन्याच्या दरात पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या देशात सोन्याची आयात कमी प्रमाणात झाली आहे.