सोन्याच्या किमतींमध्ये सलग 16 व्या दिवशी ‘विक्रमी’ वाढ, पहिल्यांदाच 57 हजारांच्या पुढं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सोन्याच्या किमतीत सलग 16 व्या दिवशीही तेजी कायम राहिली. शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याची किंमत पहिल्यांदा 57 हजार रुपयांच्या पलीकडे गेली. त्याचवेळी, एक किलो चांदीची किंमत 77 हजार रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली. कमोडिटी बाजारातील (Commodity Analyst) तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अमेरिकेच्या कमकुवत डॉलरमुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. जगातील प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर निर्देशांक हा गेल्या दोन वर्षांतील सर्वात कमी पातळीवर पोहोचला. या व्यतिरिक्त मध्यवर्ती बँकांकडून आणखी प्रोत्साहनांची अपेक्षा आणि चीन आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली.

सोन्याचे नवीन दर

शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 57,008 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. यापूर्वी गुरुवारी ते प्रति 10 ग्रॅम 57,002 रुपयांवर बंद झाले होते. यावेळी सोन्याच्या दरात 10 ग्रॅममध्ये 6 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचवेळी मुंबईतील सोन्याचा भाव वाढून प्रति 10 ग्रॅम 56254 रुपयांवर पोहोचला.

चांदीचे नवीन दर

शुक्रवारी दिल्लीत एक किलोग्रॅम चांदीची किंमत 77,264 रुपयांवरून 77,840 रुपयांवर पोहोचली आहे. या दरम्यान किंमतींमध्ये 576 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. मुंबईत चांदीचे दर प्रति किलोग्रॅम 76008 रुपयांवर पोहोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने नवीन उच्चांकी गाठली

जागतिक बाजारात आज स्पॉट गोल्ड 0.3% वाढीसह 2,068.32 डॉलर प्रति औंस पातळीवर होता. यापूर्वी सोन्याने प्रथमच प्रति औंस 2072 च्या पातळीला स्पर्श केला. तसेच चांदी 30 डॉलर पर्यंत पोहोचली. त्याच वेळी, सोन्याच्या किंमतींवर परिणाम करणारे 10 वर्षाचे अमेरिकन बाँडचे यील्ड गेल्या पाच महिन्यांच्या नीचांकावर घसरले. आज जाहीर झालेल्या अमेरिकेच्या मासिक रोजगाराच्या आकडेवारीवर व्यावसायिकांचे लक्ष लागून आहे.