खुशखबर ! सोनं झालं आणखी 1200 रूपयांनी ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कमॉडिटी बाजारात सोन्या चांदीवर दबाव वाढत असून बुधवारी सोन्याच्या दरात मोठी घसरणं झाली. गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने आज सोन्याचे दर 1200 रुपयांनी कमी झाले. MCX वर सोन्याचे दर 42,371 रुपयांपर्यंत खाली आले. मंगळवारी सोनं 584 रुपयांनी स्वस्त झालं होतं.

मागील आठवड्यात पाच दिवस कमॉडिटी बाजारात सोनं 3000 रुपयांनी महागले. सोमवारी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे दर 43,036 रुपयांपर्यंत पोहोचले. परंतु या तेजीचा गुंतवणूकदारांनी फायदा घेत जोरदार नफावसुली केली. त्यामुळे MCX वर सोनं लागोपाठ दुसऱ्या दिवशी घसरले. आज सोनं 1,200 रुपयांनी स्वस्त झाले. मागील दोन दिवसात 1,700 रुपयांनी सोन्याच्या दरात घट झाली आहे. तर चांदी 3 टक्क्यांनी घसरुन 48,049 रुपये झाली.

आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात सोन्याचा दर बुधवारी 1.9 टक्क्यांनी घसरला. सोन्याचा दर 1,643.49 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम खाली आला आहे. चीनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरस अशियाई देशात पसरु लागल्याने जागतिक अर्थव्यवस्थेचे 1 लाख कोटी डॉलर्सचे नुकसान होईल असा अंदाज ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने व्यक्त केला आहे. त्यामुळे भांडवली बाजारातील अस्थिरता पाहून गुंतवणूकदार सोन्यात सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे सोने गुंतवणूकीचा ओघ वाढल्याचे दिसते.

You might also like