खुशखबर ! ऐन पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन : येत्या दोन तीन दिवसात मराठी नववर्ष दिन म्हणजेच  गुढी पाडव्यास आरंभ होत आहे. वर्षातील  वर्षप्रतिपदा, अक्षय तृतीया, विजयादशमी हे तीन मुहूर्त आणि, बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त या साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा मानला जातो. या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्व असते. या दिवशी सोन्याच्या पेढ्यांवर विशेष गर्दी पाहायला मिळते. पाडव्याच्या मुहूतार्वर मात्र सोन्याला झळाळी आली आहे. गेल्या १० दिवसांच्या सोन्याच्या दराचा विचार करता २४ कॅरेट सोन्याचा दरात १२५० रुपयांची घसरण झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचा २४ कॅरेटचा आजचा दर ३२,२२० इतका आहे. तर २२ कॅरेटचा दर ३१,११० इतका आहे.

गेल्या १० दिवसात सोन्याचा दर पाहता सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळते आहे. मात्र ही घसरण फार मोठ्या स्वरूपाची नाही २२ मार्च २०१९ रोजी २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ३१,२५० होता तर १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ३३,४५० इतका होता. मात्र आता यामध्ये दिवसागणिक घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पण ऐन गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ही घसरण सोने खरेदीच्या दृष्टीने महत्वपूर्ण मनाली जात आहे. दरम्यान ११ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा दर वाढल्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाल्याचे दिसून आले. त्यावेळी सोन्याच्या दरात ११०० रुपयांची घसरण झाली होती.

केवळ दागिने म्हणून नाही तर गुंतवणूक म्हणून देखील सोन्याचा पर्याय निवडला जातो. आता सोन्याचा दर कमी झाल्यामुळे सोने खरेदीला वेग येईल असे तज्ञांचे मत आहे. दरम्यान दसरा दिवाळी पासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत होती मात्र त्यानंतर आता सोन्याच्या दरात घाट झाली आहे. ऐन लग्नासराईत तसेच पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा दर कमी होणे ही सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता आहे.