सोन्याच्या दरात ‘तेजी’ तर चांदीमध्ये ‘घट’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशामध्ये लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु असून यावेळी सराफ मार्केट बंद असले तरी सोन्याच्या किंमतीमध्ये काहीसा चढउतार पहायला मिळत आहे. शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये काहीसा बदल झाल्याचं पाहायला मिळालं. आज सोन्याच्या किंमती काहीशा वाढल्या आहेत तर चांदी स्वस्त झाली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 46996 रुपये झाला आहे. सोन्याच्या दरात 108 रुपयांची वाढ झाल्याचे पहायला मिळाले. तर चांदीचे दर प्रतिकिलो 500 रुपयांनी कमी झाली आहे. शुक्रवारी चांदीचे भाव प्रति किलो 46800 रुपये आहेत तर 23 आणि 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीही काहीशा वाढल्या आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर सोन्या-चांदीच्या अपडेटेड किंमती पहायला मिळतील.

वायदे बाजारात किंमती वाढल्या
वायदे बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीमध्ये 392 रुपयांची वाढ झाली. 392 रुपयांची वाढ होऊन सोन्याचा दर 46780 रुपये प्रति तोळा झाला आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याच्या जूनच्या किंमती 392 रुपयांनी अर्थात 0.85 टक्क्यांनी वाढल्या आहेत.परिणामी सोन्याचे दर 46780 रुपये प्रति तोळा आहेत. तर ऑगस्ट महिन्याच्या किंमतीमध्ये 416 रुपयांची म्हणजे 0.89 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे किंमती 46927 रुपये प्रति तोळा झाल्या आहेत.

शुद्ध सोने कसे ओळखाल ?
सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916 किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर सोनं 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.