चांदी पहिल्यांदाच किलोमागे 61 हजाराच्या पुढं, जाणून घ्या सोन्याचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून देशातील सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या जोरदार वाढीमुळे भारतीय बाजारपेठेत चांदीची किंमत 61 हजार रुपये प्रति किलोच्या पार गेली आहे. तर सोन्याच्या किंमतीनेही प्रति 10 ग्रॅम 50 हजार रुपयाची पातळी ओलांडली आहे. बुधवारी देशाच्या बाजारत एक किलो चांदीसाठी 61200 रुपये दर होता. हा दर गेल्या सात वर्षातील सर्वाधिक आहे.

मार्चमध्ये नीचांकीपेक्षा चांदीच्या भावात 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे.त्याचसोबत 2020 मध्ये 30 टक्के वाढ नोंदवली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात वाढ झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल वाढला आहे. सोन्यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक होत असल्याने सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय चांदीच्या किंमतीने देखील उच्चांक गाठला आहे.

बुधवारी एमसीएक्सवर चांदीच्या सप्टेंबरच्या कालबाह्य अनुबंधात तो मागील सत्राच्या तुलनेत 3208 रुपये म्हणजेच 5.59 टक्क्यांनी वाढून 61150 रुपयांवर गेला होता. एमसीएक्सवर चांदीचा भाव 58000 रुपयांवर उघडला आणि ट्रेंडिंगदरम्यान चांदी 61200 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली.

चांदीचे दर का वाढले ?
एंजल ब्रोकिंग कमोडिटीचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या कालावधीमध्ये गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. कोरोनामुळे खाणकामांवर देखील परिणाम झाला आहे आणि पुरवठा खंडित झाला आहे. याचा परिणाम चांदीच्या किंमती वाढू लागल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये चांदीची किंमत प्रति किलो 62 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.

सोन्याने 50 हजाराचा टप्पा ओलांडला
MCXमध्ये सोन्याच्या किंमतीमध्येही वाढ झाली. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50000 रुपयांच्या पुढे गेली आहे. बुधवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव 49931 वर उघडला आणि व्यापारादरम्यान दहा ग्रॅम 50077 रुपयावर पोहचला. गुप्ता म्हणाले, सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होईल. एका महिन्यात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51052 पातळीपर्यंत पोहचू शकते.