Gold Rate Today : सोन्याचा भाव पुन्हा वाढला, चांदी देखील दीड हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे दर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 5 महिन्यांपासून अस्थिर झालेल्या सुवर्ण बाजारात अजूनही ही अस्थिरता कायम आहे. आठवड्याभरात चांदीचा भाव दीड हजारांनी वाढून 66,500 रुपये प्रतिकिलो झाला आहे. तर सोन्याचा भाव 700 रुपयांनी वाढून 52,200 रुपये प्रति तोळा झाला आहे. एरवी पितृपक्षात कमी होणारा सोन्या-चांदीचा दर यंदा मात्र वाढताना दिसत आहे.

गेल्या 2 महिन्यांपासून सातत्यानं भाववाढ होत असलेल्या सोन्या-चांदीच्या दरात एका महिन्यापासून मात्र घसरण पाहायला मिळाली आहे. मध्यंतरी 3 ऑगस्ट रोजी चांदीच्या भावात 2 हजार रुपयांनी वाढ होऊन चांदी 68 हजारांवर पोहोचली होती. त्यानंतर पुन्हा घसरण सुरू झाली होती. परंतु गेल्या आठवड्याभरापासून पुन्हा भाववाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरात 9 सप्टेंबर रोजी 65 हजारांवर असलेल्या चांदीच्या भावात वाढ होत जाऊन चांदी आता 66,500 रुपये प्रतिकिलो झाली आहे. तर गेल्या आठवड्याभरात 9 सप्टेंबर रोजी 51,500 प्रति तोळा असलेल्या सोन्याच्या भावात 700 रुपयांनी वाढ होऊन सोनं आता 52,500 रुपये प्रतितोळा झालं आहे.

यंदाचं चित्र उलट

जुलै, ऑगस्ट महिन्यात सोन्या-चांदीची मागणी घटल्यानं दरवर्षी या महिन्यात सोन्या चांदीचे भाव कमी होतात. त्यातही पितृपक्षात तर हे भाव आणखी कमी होतात. परंतु यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सुवर्ण बाजारातील अस्थिरतेमुळं पितृपक्षात सोन्या-चांदीचे भाव वाढत आहेत. दलालांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळं सातत्यानं भाव अचानक कमी जास्त होऊन बाजारात अस्थिरता निर्माण होत असल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे.