सोने महागणार ?

मुंबई : वृत्तसंस्था

सोन्याकडे केवळ दागिने घडवण्यासाठी नाही तर गुंतवणूक म्हणून सुद्धा पाहिले जाते. लग्नसराई आणि दिवाळी सारख्या सणांमध्ये देखील सोने खरेदीला विशेष महत्व असते. आता यंदाच्या वर्षी दिवाळीपर्यंत सोने ३४ हजारांची पातळी गाठेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यंदाच्या दिवाळीत सोन्याचा दर ३४ हजार रुपये तोळा इतकी कमाल पातळी गाठू शकतो. डॉलर च्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यांकन होत असल्यामुळे तसेच आंतरराष्ट्रीय भू-राजकीय आव्हानांचा परिणाम यामुळे सोन्याच्या किंमती वाढू शकतात अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

सध्या भारतीय बाजारामध्ये सोन्याचा दर ३० हजार ते जास्तीत जास्त ३२ हजार इतका आहे. हा भाव दिवाळीमध्ये ३४ हजार प्रति तोळा जाऊ शकतो. अशी माहिती कॉमट्रेंडज रिस्क मॅनेजमेंटचे संचालक ज्ञानशेखर त्यागराजन यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना ही शक्यता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भू-राजकीय आव्हानांचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम होत असतो . याशिवाय भारतीय रुपयाचे अवमूल्यन होत असून डॉलर दिवसेंदिवस बळकट होत आहे. रुपयाच्या या अवमूल्यनाचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत असून दिवाळीपर्यंत यात वाढ होण्याची शक्यता आहे. असं ज्ञानशेखर त्यागराजन म्हणाले. सोन्यात होणाऱ्या गुंतवणुकीत घट झाल्याचे दिसत आहे, कारण शेअर बाजारातून चांगला परतावा मिळतोय त्यामुळे सोन्याच्या किंमतीवर याचाही परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले.

दरम्यान ,कमोडिटी अॅंड करन्सीच्या मॅनेजिंग डायरेक्टर प्रीति राठी यांनी दिवाळीमध्ये सोन्याचे भाव प्रतितोळा ३१,५०० ते ३१,८०० हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात असा अंदाज वर्तवला आहे.