फक्त 3 महिन्यात 6 हजारानं वाढल्या सोन्याच्या किंमती, आगामी काही दिवसांमध्ये ‘एवढं’ महागणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्याचा काळ हा लग्नसराईचा आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडत असते. पण आता सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे, याचे कारण आहे सोन्याचा वाढत चाललेला भाव. गेल्या ३ महिन्यात सोन्याचा भाव तब्बल ६ हजार रुपयांनी वाढला आहे. सोन्याच्या दराने ३८ हजारावरून थेट ४२ हजारांवर उडी घेतली आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सोन्याचा दर वधारला असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोना व्हायरस चा प्रभाव जर असाच वाढत राहिला तर, सोने अजून ४ हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे, असे सराफ व्यापारांचे म्हणणे आहे. कोरोना मुळे चीनची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळे जगावर परत एकदा आर्थिक मंदी येण्याचे सावट आहे. भारतासह जगाची अर्थव्यवस्था जेव्हा अस्थिर होते, तेव्हा स्थिर गुंतवणुकीसाठी ग्राहक सोने खरेदीकडे वळतात.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव १ हजार ६४९ डॉलर प्रतिऔंस आणि चांदी १८.०५ डॉलर प्रतिऔंस होती. तर दिल्लीत सोन्याचा भाव ४३ हजार ५१३ रुपये प्रतितोळा होता. चीनमध्ये कोरोना व्हायरसने जगात धुमाकूळ घातला आहे. या मूळे सोन्यात केलेली गुंतवणूक नागरिकांना सुरक्षित वाटत आहे. दक्षिण कोरिया, इटली आणि मध्यपूर्व मध्ये कोरोना व्हायरस चा प्रभाव वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गोंधळ निर्माण झाला आहे. जगभरातल्या शेअर बाजारातंही चिंतेचं वातावरण आहे.