सोमवारी घसरण झाल्यानंतर आज पुन्हा वाढले सोन्या-चांदीचे दर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या किंमती वधारल्या आहेत. दरम्यान आज मंगळवारी सकाळी देशभरातील सराफा बाजारात सोन्याच्या स्पॉट किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. सोन्याच्या किमतीमध्ये तब्बल 267 रुपयांनी वाढ झाली आहे, त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचे भाव आता प्रति तोळा 47314 रुपये झाले आहेत. तसेच 23 कॅरेट आणि 18 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यामध्ये देखील आज वाढ झाल्याचे दिसून आले. दरम्यान चांदीचे देखील भाव आज वाढले आहेत. प्रति किलो 630 रुपयांची वाढ चांदीच्या किंमतीमध्ये दिसून आली.

आज 23 कॅरेट सोन्याचे दर सुमारे 266 रुपयांनी वाढले असून ते आता 47125 रुपये प्रति तोळा इतके झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत 245 रुपयांची वाढ झाली असून 43340 रुपये प्रति तोळा झाले आहे. यासोबतच 18 कॅरेट सोन्याच्या किंमतीत देखील 201 रुपयांची वाढ झाली असून 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 35486 रुपये झाली आहे.

दरम्यान या सोन्याचांदीच्या किंमतीवर जीएसटी लावण्यात आलेला नाही. सोन्याचांदीच्या किंमती या इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाइट (ibjarates.com) वर अपडेट केल्या जातात. त्यानुसार हे दर वधारलेले दिसून आले आहेत.

सोन्याच्या वायदे किंमतीत देखील झाली वाढ
सोन्याच्या स्पॉट किंमतीनंतर सोन्याच्या वायदे बाजारात देखील मंगळवारी किंमती वाढल्याचे दिसून आले आहे. यामध्ये तब्बल 310 रुपयांनी सोने महागले आहे, परिणामी वायदे बाजारात सोन्याच्या किंमती या 47,336 रुपये प्रति तोळा झाल्या आहेत. एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याच्या किंमती ऑगस्ट महिन्यासाठी 310 रुपयांनी वाढल्या असून त्या 47,336 रुपयांवर पोहोचल्या आहेत. तर ऑक्टोबर महिन्यासाठी या किमती 303 रुपयांनी वाढून 47,443 रुपयांवर पोहोचल्या आहेत.