‘सोन्या-चांदी’च्या दरात आतापर्यंतची कमालीची ‘तेजी’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात १० ग्रॅम मागे १,३९५ रुपयांची वाढ झाली आहे. या तेजीमुळे राष्ट्रीय राजधानीत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४१,७०५ रुपयांवर आली आहे. जागतिक किंमती वाढल्यामुळे सोन्याच्या किंमतीतील ही वाढ नोंदविण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे गुरुवारी सोने प्रति १० ग्रॅम ४०,३१० रुपयांवर बंद झाले होते.

शुक्रवारी चांदीच्या दरातही प्रचंड वाढ नोंदविण्यात अली. शुक्रवारी चांदीच्या दरात एका किलोग्रॅम मागे जवळपास २,८८९ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा दर प्रतिकिलो ३८,१०० रुपयांवर आला आहे. विशेष म्हणजे चांदी गुरुवारी ३५,२११ रुपये प्रतिकिलोवर बंद झाली होती.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांनी सांगितले की, शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याच्या चालू दरातही १,३९५ रुपयांची वाढ पहायला मिळाली. ते म्हणाले की जागतिक किंमती वाढल्यामुळे ही तीव्र वाढ नोंदविण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाले तर सोन्या-चांदीने जोरदार उसळी घेतली आहे. शुक्रवारी जागतिक बाजारात सोन्याचा भाव १,५१४ डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव १२.९६ डॉलर प्रति औंस होता. पटेल म्हणाले की, कमोडिटीजमधील ब्रॉड-बेस्ड रिकव्हरीसह सोन्याचे भाव उसळी घेऊन व्यापार करीत आहेत.