Gold Sliver Rate : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा झाले बदल, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सराफा बाजारात आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार दिसला. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 182 रुपयांनी चढले. पण बाजार बंद होण्याच्या वेळी सोनाचा भाव थोडासा उतरला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाला तेजी मिळाल्याने स्थानिक बाजारपेठेतही त्याचे परिणाम दिसले. त्यातच सणासुदीचा हंगाम असल्याने सोने-चांदी बाजार चढ्या दराचाच राहिला.

सोन्याचा दर सोमवारी दिल्लीच्या सराफा बाजारात 10 ग्रॅमला 51558 रुपयांवर स्थिरावला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1909 डॉलर प्रति औन्स एवढ्यावर पोहोचला होता. तसेच सोन्याबरोबर चांदीचे दरही वाढले. एक किलो चांदीचा दर 63,714 रुपये होता. गेल्या आठवड्यापेक्षा चांदीचा भाव किलोमागे 805 रुपयांनी वाढला. 62,909 रुपये प्रतिकिलो या दरावर शुक्रवारी चांदीचे दर स्थिरावले होते. पण आज आठवड्याच्या सुरुवातीलाच चांदीच्या दराने पुुन्हा उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीचा दर 24.64 डॉलर प्रति औन्स एवडा पोहोचला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे सोन्या-चांदीचे दर वाढत आहेत. HDFC सिक्युरेटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी काही दिवस सोन्याच्या दरात जगभरात वाढ होताना दिसून येईल. याचे परिणाम स्थानिक सराफा बाजारपेठेतही दिसून येतात. चांदीच्या दरातही सोमवारी वाढ झाल्याचे दिसून आले.

कोरोनाचा सोन्या-चांदीच्या भावाशी काय संबंध
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तसा लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार पुर्णतः ठप्प झाले. याचा थेट परिणाम आता देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. जगभरात अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडू लागली आहे. अस्थिर अर्थव्यवस्थेत चलनाचे दर कमी होतात आणि मग अशा वेळी मौल्यवान धातूंचे दर वाढतात. सोमवारी अमेरिकन डॉलरचं मूल्यही थोडं ढासळलं. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर झाला आणि सोन्याचे भावात वाढ झाली. स्थानिक बाजारपेठेतही त्याचाच परिणाम म्हणून दर चढले. पण आधीच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतात मागणी वाढली असल्याने सोन्याचे दर वाढले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दराचा जास्त परिणाम लगेच जाणवला नाही.