महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरानं गाठली ‘उच्चांकी’, चांदी प्रति किलो 50 हजारांवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. देशात देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात कोरोनाच्या संकटादरम्यान सोन्याच्या किंमती रोज नवनवे रेकॉर्ड रचत आहे. सोन्याच्या किंमतींनी जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी देखील नवे रेकॉर्ड रचले आहे. MCX एक्सचेंजवर ऑगस्टसाठीच्या सोन्याचे भाव 0.4 टक्क्यांनी वाढले आहेत. परिणामी चांदीच्या किंमतीने 50 हजारांचा भाव ओलांडला आहे. चांदीचे भाव प्रति किलो 50 हजार 779 रुपये प्रति किलो इतके झाले आहेत. देशांतर्गत सोन्याची किंमत प्रति तोळा 48 हजार 825 रुपये झाली आहे.

यामध्ये 12.5 टक्के आयात कर आणि 3 टक्के जीएसटीचा देखील समावेश आहे. कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती आज आठ वर्षाच्या उच्चांकाजवळ पोहचल्या आहेत. आर्थिक अनिश्चितेच्या काळात सुरक्षित असणाऱ्या सोन्याची मागणी वाढत आहे. जागतिक बाजारपेठेत स्पॉट गोल्डची किंमत 0.1 टक्क्यांनी वाढून 1.782.21 डॉलर प्रति औंस झाली आहे. ऑक्टोबर 2012 मध्ये ही सोन्याने सर्वाधिक किंमत 17.85.46 डॉलर प्रति औंस एवढे दर गाठले होते. त्या रेकॉर्डच्या जवळ आजच्या किंमती पोहोचल्या आहेत.

लॉकडाऊन काळात सोन्याच्या किंमतीने असे अनेक रेकॉर्ड रचले आहेत परिणामी लवकरच सोन्याच्या किंमती 50 हजारांपेक्षा जास्त असण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या मते कोरोना व्हायरस पँडेमिक, भारत-चीन संघर्ष आणि अमेरिकी बँक फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर न वाढण्याचा निर्णय, या सर्व कारणांमुळे सोन्याच्या किंमतींचा आलेख वाढत आहे.