सोन्याची रेकॉर्डब्रेक घोडदौड सुरूच, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर तेजीनं वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोना काळात सुद्धा सोन्याला मोठ्या प्रमाणात झळाळी आली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात ०.०८ टक्के वाढ होऊन दहा ग्रॅम सोन्याचा भाव ५३,४९० रुपये झाला आहे. तर चांदीचा भाव ७०० रुपयांनी वधारला असून, एक किलो चांदीची किंमत ६५,६९० रुपये झाली आहे. ह्या महिन्यात अनेक सण उत्सव असल्याने बाजार सुरु होताच सोन्याच्या दराने तेजी घेतली असून, चांदीच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली आहे.

अमेरिकेची अर्थव्यवस्था धोक्यात सापडली आहे. म्हणून सातत्याने डॉलरमध्ये घसरण होत असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित साधनात गुंतवणूक करण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे सोन्याच्या भावात तेजी निर्माण झाली आहे. चालू आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात वाढ नोंदवली गेली. आता ही वाढ दिवाळीपर्यंत अशीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव ५६,००० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतराष्ट्रीय बाजार सुद्धा सोन्याचे भाव प्रतिऔंस २००० डॉलर पर्यंत पोहचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

यापूर्वी कमॉडिटी बाजारात सोने सत्रात ६५० रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ५३,८४४ रुपयांवर पोहचले होते. गुरुवारी बाजार बंद होताना सोने प्रति दहा ग्रॅमसाठी ५३,१३८ रुपयांवर पोहचले. तर शुक्रवारी सोन्याच्या दराने ५३,८४४ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली.

दोन सत्रात चांदी ३००० रुपयांनी वाढली

दोन दिवसांत चांदीच्या दरात ३००० रुपयांची वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदीच्या वायद्यात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली. सप्टेंबर वायद्यांची चांदी २,२७२ रुपयांच्या तेजीसह प्रति किलो ६४,९४२ रुपयांपर्यंत पोहचली. सत्रांतर्गत व्यवहारादरम्यान चांदी ६५,९३० रुपयांवर पोहचली. तर डिसेंबर वायद्यांची चांदी २,२५३ रुपयांच्या वाढीसह ६६,५६० रुपयांवर आणि मार्च २०२१ वायद्यांची चांदी २,६०५ रुपयांसह ६७,९६० रुपयांच्या पातळीवर गेली.