खुशखबर ! सोने-चांदीच्या दरात घसरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – घरगुती पातळीवर सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. आज दिल्लीत सोन्याचा दर 250 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 32,620 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय. मागणी कमी झाल्यामुळे चांदीचा भाव 825 रुपयांवरून 37,700 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे. अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मागणी कमी झालीय. म्हणून सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईत सोने -चांदी स्वस्त झाल्यामुळे सामान्य नागरिकांसाठी ही आनंदाची बाब मानली जात आहे.

तर चांदीची किंमत 825 रुपयांनी कमी होऊन 37700 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. डिलिवरी बेस्ड चांदीच्या किमती 699 रुपयांनी कमी होऊन 36374 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. केवळ दागिने म्हणून नाही तर गुंतवणूक म्हणून देखील सोन्याचा पर्याय निवडला जातो. आता सोन्याचा दर कमी झाल्यामुळे सोने खरेदीला वेग येईल असे तज्ञांचे मत आहे.

दरम्यान राजधानी दिल्लीत 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं अनुक्रमे 250-250 रुपयांनी कमी होऊन 32620 रुपये आणि 32450 रुपये प्रति 10 ग्रॅम झालंय. बुधवारी सोन्याची किंमत 130 रुपये प्रति 10 ग्रॅम कमी झाली आहे.. बुधवारी 55 रुपये आणि मंगळवारी 75 रुपयांनी सोन्याची किंमत कमी झाली आहे.

का घसरला सोन्याचा दर ?
व्यापाऱ्यांनी सांगितलं की, घरगुती पातळीवर सोन्याची मागणी कमी झाली म्हणून किमती कोसळल्या. त्याचबरोबर अमेरिकन अर्थव्यवस्थेत आलेल्या मजबुतीमुळे गुंतवणूकदार सोन्याऐवजी शेअर बाजारात गुंतवणूक करतात. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव कमी झालेत.

कशी कराल खऱ्या दागिन्यांची पारखं
आजकाल खऱ्या दागिन्यांच्या सोबतच इमिटेशन ज्वेलरी किंवा नकली दागिने देखील बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. सोन्या-चांदीच्या किंवा इतर मौल्यवान रत्नांनी बनलेल्या दागिन्यांची खरेदी आपण शक्यतो आपल्या ओळखीतील आणि खात्रीशीर जव्हेऱ्यांकडेच करीत असतो. तरी अनकेदा चोख दागिना देण्याच्या बहाण्याने नकली दागिने किंवा रत्ने दिल्याच्या घटना सर्रास घडताना आपण ऐकत असतो. एखादा दागिना घ्यायचा झाला, तर त्यासाठी आपल्या मेहनतीचे पैसे आपण मोजत असतो, त्यामुळे इतके पैसे खर्च करून विकत घेतलेला जिन्नस चोख असावा ही आपली अपेक्षा योग्यच असते. आपण घेत असलेला दागिना चोख आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी काही पर्याय अवलंबता येतील.

दागिना खरेदी करताना सर्वात आधी त्यावर ‘हॉलमार्क’ किंवा आपण ज्यांच्याकडून दागिना खरेदी करीत आहोत त्यांचा ट्रेडमार्क त्यावर असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच दागिना ज्या धातूने बनलेला आहे, त्याची शुद्धता देखील या ट्रेडमार्कमध्ये अंकित असते. दागिन्यामध्ये चोख धातूची मात्रा जास्त असल्यास हा दागिना लोहचुंबकाला पटकन चिकटणार नाही. पण धातूमध्ये इतर कमी दर्जाच्या धातूची भेसळ असल्यास तो धातू लोहचुंबकाला पटकन चिकटतो. सोन्याची पारख करताना दागिना ‘अनग्लेझ्ड’ टाईलवर घासून पाहिल्यास टाईलवर सोनेरी डाग येतील. जर सोने शुद्ध नसेल, तर टाईल वर उठणारे ओरखडे राखाडी किंवा काळसर रंगाचे दिसतात. सोने चोख आहे किंवा नाही हे पाहण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे व्हिनेगर. व्हिनेगर दागिन्यावर टाकले असता, दागिन्यातील सोने चोख नसेल, तर दागिना लगेच काळा पडल्याचे दिसून येते.

हातात घातलेली चांदीची अंगठी जर शुद्ध चांदीची असेल, तर जिथे त्या दागिन्याला सतत पाणी, तेल किंवा इतर तत्सम पदार्थ लागत असेल, तेथील त्वचा निळसर दिसू लागते. तसेच चांदीच्या जिन्नसावर खडू घासला असता, जर चांदी शुद्ध नसेल, तर ज्या ठिकाणी खडू घासला आहे तो भाग त्वरित काळा पडू लागतो. त्यावरून दागिन्यातील चांदी शुद्ध असल्याचे समजू शकते. प्लॅटीनम चांदी प्रमाणेच शुभ्र दिसते. याचा दागिना चोख आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी अमोनियाचा वापर करता येतो. अमोनियाचे काही थेंब दागिन्यावर टाकले असता, धातू चोख नसल्यास तो त्वरित काळा पडतो.