‘उच्चांकी’वरून 6000 रूपये स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या दिवाळीपर्यंत काय असेल दर

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सातत्याने घट होताना दिसत आहे. सोमवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा वायदा 0.9 टक्क्यांनी घसरून ते प्रति १० ग्रॅम 50,130 रुपयांवर व्यवसाय करताना दिसला. तर चांदीचा वायदा 0.88 टक्क्यांनी घसरून 60,605 रुपये प्रति किलो झाला. शुक्रवारी सोन्याचा दर 0.4 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला होता. या दिवशी चांदीच्या दरात 1.6 टक्क्यांनी वाढ झाली होती. ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली. यावेळी चांदीचा दरही प्रति किलो 80,000 रुपयांवर पोहोचला होतो.

काय आहे जागतिक बाजारपेठेची स्थिती?
जागतिक बाजारपेठेबद्दल बोलायचे म्हणले तर, गुंतवणूकदार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहेत. सोमवारी जागतिक बाजारपेठेत सोन्याची किंमत 1,900 प्रति औंस स्थिर राहिली. पूर्वी सोन्याच्या किंमतीवर डॉलरमध्ये मजबूतीचा परिणाम पहायला मिळाला. तथापि, सोमवारी कमकुवत डॉलरमुळे गुंतवणूकदारांना सोने खरेदी करण्यास मदत मिळाली आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरातील बाजारात मोठी घसरण झालेली पहायला मिळाली आहे. पण, आता ते स्थिर होत आहे. आर्थिक क्रियाकलाप सुरू झाल्याने आता बाजारातही तेजी दिसून येत आहे. आता बाजारात रिकव्हरी पहायला मिळत आहे. यामुळेच 30 सप्टेंबरपासून घरगुती सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 5,684 रुपयांनी घट झाली आहे. चांदीची किंमत प्रति किलो सुमारे 16,034 रुपयांनी घसरली आहे.

दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत किती असेल?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोन्याच्या किंमतीतील घसरण म्हणजे पूर्वीच्या पातळीवर येईल असे नाही. सध्या सोन्याचा भाव 50,000 आणि चांदीचा भाव 60,000 रुपये आहे. येत्या काळात सोन्यात चढ-उतार होऊ शकतात. दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ किंवा घसरण होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दीपावलीवरही सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 50 ते 52 हजार रुपये पातळीवर राहू शकते.

रुपयामध्ये सोन्याच्या किंमतीत घट
गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमती कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या दोन महिन्यांतील डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली वाढ. सध्या रुपया 73 ते 74 च्या श्रेणीत आहे. कोरोना संकटाच्या सुरुवातीच्या काळात ते 78 च्या पातळीवर पोहोचले होते. रुपया तेजीने परत आल्याने सोन्याचा भावही खाली आला आहे. जर डॉलर वाढला तर पिवळ्या धातूच्या किंमती दीर्घ कालावधीत अधिक वेगाने वाढतील.