11 दिवसात सोन्याचे भाव 4000 रुपयांनी घसरले, जाणून घ्या आज काय होणार बदल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर सर्व आर्थिक उलाढाल, व्यापार ठप्प झाला होता.त्यामुळे शेअरमार्केटवर मंदीचा परिणाम झाला. त्यावेळी अनेकांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीचा मार्ग निवडला. या कारणामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले. मात्र आता देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती कमी होऊ लागल्या आहेत. गेल्या 11 दिवसांत दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 4000 रुपयांनी कमी झाले आहेत.

अमेरिकेतील कमजोर बेरोजगारीच्या आकड्यांमुळे सोन्याच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा तेजी आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा 1940 डॉलर प्रति औंसवर पोहोचल्या आहेत. मात्र, तज्ज्ञांकडून येणाऱ्या काही दिवसात सोन्याच्या किंमती उतरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी डॉलर इंडेक्समध्ये मजबूती आल्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. मात्र, बेरोजगारी आणि मॅन्यूफॅक्चरिंग इंडेक्सच्या कमजोर आकड्यामुळे आर्थिक रिकव्हरीच्या आशेला झटका बसला. यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये कमी स्तरावरील खरेदी पहायला मिळाली.

भारतात सोन्याची किंमती आणखी उतरणार ?

तज्ज्ञांच्या मते सद्यपरिस्थितीत सोन्याचे दर आणखी कमी होऊ शकतात. टेक्निकल चार्टवर देखील सोने आता कमजोर दिसत आहे. दरम्यान, आज सोन्याचे भाव स्थिर राहू शकतात किंवा थोडाफार बदल होऊ शकतो.

गुरुवारचे सोन्या-चांदीचे दर

गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किंमत 54311 प्रति तोळावरून 52819 रुपये प्रति तोळा झाली. सोन्याच्या दरात 1492 रुपयांची घसरण झाली. मुंबईत 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किंमती कमी होऊन 52528 रुपये प्रति तोळा आहेत. त्याचप्रमाणे चांदीचे भाव देखील मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. दिल्लीत चांदीचा भाव 1476 रुपये प्रति किलोने घसरला. त्यामुळे चांदीचा दर 69400 वरुन 67924 रुपये प्रति किलो झाले आहेत. मुंबईत चांदीचे दर 66448.80 रुपये प्रति किलो आहेत.