Gold Rates Today : आतापर्यंत 7927 रुपयांनी उतरले सोने, जाणून घ्या काय आहेत आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   कोरोनावरील लशीबाबतच्या सकारात्मक बातम्यांमुळे सोन्याच्या किंमतींवर दबाव वाढला आहे.परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने स्वस्त झाल्याने याचा देशांतर्गत बाजारावरही परिणाम झाला आहे. ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56, 200 रुपये प्रति तोळा या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. त्यानंतर मंगळवारी (दि.1) दर 48273 प्रति तोळा झाले आहेत. अर्थात आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 7927 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. दरम्यान मंगळवारी सुरुवातीच्या घसरणीनंतर झालेल्या तेजीमुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये किंचित बदल झाला. प्रति तोळा सोन्याची किंमत 45 रुपयांनी वाढली आहे. मागणी वाढल्यामुळे चांदीचे दर 407 रुपयांनी वाढले आहेत.

कमोडिटी तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या लशीच्या आशेमुळे भविष्यातील जागतिक आर्थिक वाढीच्या संभाव्यतेत सुधारणा झाली आहे, तसेच अमेरिकेने नवीन राष्ट्राध्यक्ष जो बायडन जानेवारीत राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. यामुळे जागतिक आर्थिक वाढीच्या आशा निर्माण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे कमजोर आर्थिक धोरण आणि महागाईचा धोका यामुळे सोन्याच्या किंमती वाढण्याचीही शक्यता आहे. असे असले तरीही डॉलरची कमजोरी असूनही गेल्या महिन्यात सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या होत्या. जगातील अन्य चलनांच्या तुलनेत डॉलर दोन वर्षांच्या नीचांकावर घसरला आहे.

सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today )

दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमतीत किरकोळ 45 रुपयांनी वाढ झाली आहे. यानंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर 48,273 रुपये प्रति तोळा झाले आहेत. याआधीच्या सत्रात सोमवारी दर 48,228 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1812 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

चांदीचे आजचे भाव (Silver Price Today)

एचडीएफसी सिक्‍योरिटीजच्या माहितीनुसार चांदीच्या किंमतीमध्ये आज वाढ पाहायला मिळाली. आज दिल्लीतील सराफा बाजारात चांदी 407 रुपये प्रति किलोने महागली आहे. यानंतर चांदीचे भाव प्रति किलो 59,380 रुपये झाले आहेत. याआधीच्या सत्रात सोमवारी चांदीचे दर प्रति किलो 58,973 होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे दर 23.24 डॉलर प्रति औंस आहेत.

वायदे बाजारात आज तेजी दिसून आली

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीमुळे मंगळवारी एमसीएक्सवर देखील सोन्याचांदीच्या किंमतीत तेजी पाहायला मिळाली. सुरुवातीच्या सत्रात एमसीएक्सवर फेब्रुवारीसाठी सोन्याची वायदे किंमत 0.3 टक्क्यांनी वाढून 48,070 प्रति तोळा झाली आहे. तर चांदी वायदे बाजारात 1.2 टक्क्याने वधारली आहे. यानंतर चांदीचे दर 60,977 प्रति किलोवर पोहोचले आहेत. सोमवारी संध्याकाळच्या सत्रात सोन्याची वायदा किंमत 0.4 टक्क्याने उतरली होती, तर चांदी देखील 0.2 टक्क्याने कमी झाली होती. ऑगस्ट महिन्यात 56,200 रुपये प्रति तोळाच्या उच्च स्तरावर पोहोचल्यानंतर सोन्याचे दर उतरू लागले आहेत. फक्त नोव्हेंबर महिन्यात सोन्याचे दर जवळपास 3000 रुपयांनी कमी झाले आहेत.