नव्या ‘उच्चांकी’वर पोहचले सोन्याचे दर तर चांदीमध्ये देखील तेजी, जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्या-चांदीच्या किंमतीत सोमवारीही वाढ झाली. यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत सुमारे ३५ टक्के वाढ झाली आहे. सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्या आणि चांदी या दोन्हीच्या किंमतीत अनुक्रमे १८५ रुपये प्रति १० ग्राम आणि १,६७२ रुपये प्रति किलोग्रॅम वाढ झाली. आजपासून सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड (एसजीबी) चे पाचवे ट्रांचही सब्स्क्रिप्शनसाठी उघडले गेले आहे. सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड ही एक प्रकारची सरकारी सिक्युरिटी असते, जी आरबीआयकडून जारी केली जाते.

सोन्याचे नवीन दर
सोमवारी एका दिवसाच्या व्यापारानंतर दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात १८५ रुपये प्रति १० ग्रॅमने वाढ झाली. यानंतर आता नवीन दर ५४,६७८ रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी शुक्रवारी व्यापार सत्रानंतर सोन्याचा भाव ५४,४९३ रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव वाढत आहे आणि सध्या ते प्रति औंस १,९७३ डॉलर पातळीवर आहे.

चांदीचे नवीन दर
चांदीच्या भावात आज मोठी वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात आज १ किलो चांदीचा भाव १,६७२ रुपयांनी वाढून ६६,७४२ रुपयांवर पोहोचला. यापूर्वी पहिल्या व्यापार सत्रात चांदीचा भाव ६५,०७० रुपये पातळीवर होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीचा भाव प्रति औंस २४.३० डॉलरवर आहे.

आज का वाढले सोन्या-चांदीचे भाव?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, रुपयातील कमजोरीनंतर दिल्ली सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १८५ रुपयांनी वाढ झाली आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपया २० पैशांनी घसरला आहे आणि ती ७५ रुपयांच्या पातळीवर गेली आहे. अमेरिकन चलनात मजबुती आणि देशांतर्गत इक्विटीजमध्ये घट झाल्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये वाढ झाली.

यावर्षी ३५ टक्के महाग झाले सोने
भारतात यावर्षी सोन्याच्या भावात आतापर्यंत ३५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतही मौल्यवान धातूंमध्ये तेजी दिसून येत आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, कोविड-१९ मुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी घसरण झाली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे परिस्थिती अधिक कठीण झाली आहे. यामुळेच सोन्या-चांदीचे भाव वाढत आहेत.

काय आहे विश्लेषकांचा अंदाज?
आगामी काळात सरकारकडून आणखी एक मदत पॅकेज जाहीर करण्याची अपेक्षा आहे. यानंतर आता पुन्हा सोन्याचा भाव वाढेल, असा अंदाज विश्लेषक व्यक्त करत आहेत. गोल्डमन सॅक्सचा अंदाज आहे की, सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २,३०० डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. तर बँक ऑफ अमेरिकेचे म्हणणे आहे की, हे भाव प्रति १० ग्रॅम ३,००० डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. मात्र जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, यंदाच्या वर्षा अखेर पिवळ्या धातू चमक कमी होईल.