सोन्याचे भाव गगनाला भिडले ! इतिहासात पहिल्यांदाच दराने गाठली ‘ही’ उंची

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी देशात सोनं आतापर्यंतच्या उच्चांकीवर पोहोचलं आहे. रुपयात घसरण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमतीत तेजी आल्याने सोमवारी दिल्ली सराफ बाजारात सोनं 953 रुपयांनी महागलं. सोन्यासह चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाली. चांदी 586 रुपयांनी महागली. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे सोन्याच्या किंमतीत तेजी आली आहे. जोखीम वाढल्याने लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत.

सोन्याचे दर –
दिल्ली सराफ बाजारात सोनं 44,472 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. आंतरराष्ट्रीय सराफ बाजारात सोन्याचे दर वाढून 1,682 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले. तर चांदी 18.80 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली. आज सोनं 953 रुपयांनी महागलं.

चांदीचे दर –
सोमवारी चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली. चांदी 586 रुपयांनी महागून 49,990 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

का वाढत आहेत सोन्याचे दर –
HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की रुपया गडगडल्याने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती मजबूत झाल्याने दिल्लीत 24 कॅरेट सोनं आतापर्यंतच्या उच्चांकीवर पोहोचलं. आज सकाळी रुपया 30 पैशांनी गडगडून 71.94 प्रति डॉलर झाला. तर त्यानंतर रुपया 22 पैशांनी गडगडला. शेअर बाजारात घसरणं झाल्याने सोन्याच्या किंमती वाढल्या.

ते म्हणाले की कोरोना व्हायरस आता चीनमधून जगभरात पसरत असल्याचा देखील हा परिणाम आहे. चीनशिवाय दक्षिण कोरिया, मध्य अशिया आणि इटलीमध्ये देखील कोरोना व्हायरसचे संशयित आढळले. आंतरराष्ट्रीय बाजारात याचा परिणाम पहायला मिळाला. जगभरातील शेअर बाजारांवर कोरोनाचे सावट आहे.