सोन्याची तस्करी करणाऱ्याला पुणे विमानतळावर अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – दुबईहून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आलेल्या विमान प्रवाशाकडून १४ लाख ६६ हजार रूपये किंमतीचे अर्धाकिलो सोने जप्त केले. रविवारी पहाटेच्या सुमारास सीमाशुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. मोहम्मद नखीब शब्बीर हसन बापू असे सोने तस्करी करताना पकडलेल्या प्रवाशाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती, मोहम्मद नखीब हा दुबईहून आलेल्या स्पाईस जेट एसजी – ५२ या विमानातून रविवारी दि. १७ मार्च रोजी पहाटे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. तो घाईत बाहेर पडत असताना सीमा शुल्क विभागाच्या पथकास संशय आला. कर्मचाऱ्यांनी त्याची अंगझडती घेतली. तेव्हा जीन्स पॅन्टमध्ये कंबरेभोवती गुंडाळलेल्या प्लास्टिक पट्टीमध्ये त्याने सोन्याचे पेस्ट करून सोने लपवून आणल्याचे आढळून आले. त्याच्याकडून ५५९.६० ग्रॅम्स वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. तसेच त्याच्याविरोधात कस्टम्स अ‍ॅक्ट १९६२ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

आखाती देशातून शरिरावर परिधान केलेल्या विविध वस्तूंमध्ये सोने लपवून आणण्याचे प्रकार वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सीमा शुल्क विभाग सतर्क असून प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. पुणे विमानतळ येथील कस्टम्स विभागाचे उपायुक्त हर्षल मेटे यांच्या मार्गदर्शनाखालील वरिष्ठ निरीक्षक अमजद शेख, संजय सुमकुवर, सुधा अय्यर, निरीक्षक विकास पोमन, राजरुद्रा मीना, अंकित सिंग, बाळासाहेब असवले, शिवाजी वाळू, सतीश सांगले या पथकाने ही कारवाई केली.