सोनं 2000 रूपये स्वस्त झालं, चांदीमध्ये 9000 रूपयांची घसरण, एका आठवड्यातील सर्वात मोठी घट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – या आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण दिसून आली आहे. गेल्या कित्येक महिन्यांत दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये इतकी मोठी घट दिसून आली नव्हती. शुक्रवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा वायदा भाव २३८ रुपयांनी घसरून ४९,६६६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. सोन्यासह चांदीतही घट दिसून आली. चांदी जवळपास १ टक्क्यांनी घसरून ५९,०१८ रुपये प्रति किलो झाली आहे.

साप्ताहिक आधारावर सोन्याचा सुमारे २ हजार रुपये प्रति १० ग्रामने घसरला. तर चांदी सुमारे ९ हजार रुपये प्रति किलोग्रॅमपेक्षा अधिक स्वस्त झाली आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, सोन्याचा भाव ४९,२५० रुपयांच्या खाली येणे म्हणजे आता ते ४८,९०० ते ४८,८०० रुपये प्रति १० ग्राम दरम्यान व्यापार करेल.

जागतिक बाजारात १५ टक्के स्वस्त झाली चांदी
जागतिक बाजारात मार्चनंतर सोन्या-चांदीत सर्वात मोठी घट दिसून आली. येथे गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या भावात ४.६ टक्क्यांनी घट झाली आहे, तर चांदीही १५ टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. डॉलरमध्ये मजबुती आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबत अनिश्चिततेमुळे मौल्यवान धातूंची किंमत कमी होत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

वाढती महागाई बनली समस्या
सोन्यातील गुंतवणूकीचे आणखी एक कारण म्हणजे वाढत्या महागाईशी सामना करण्यास मदत होते. पण सुस्त रिकव्हरी दरम्यान महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन महिन्यांत डॉलर सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे, ज्याचा परिणाम सोन्याच्या घसरत्या किंमतीवर झाला आहे.

काही विश्लेषक असेही म्हणतात की, सोन्याच्या किंमतीतील ही घट काही काळासाठी होईल. वास्तविक अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही अनिश्चितता कायम आहे. तर दुसरीकडे आर्थिक दृष्टीकोन काही सकारात्मक संकेत देत नाही आणि भू-राजकीय तणाव देखील सोन्याच्या मागणीवर परिणाम करत आहे.

अमेरिकेत प्रोत्साहन पॅकेजमुळे डॉलर बळकट होईल
येत्या काही दिवसांत अमेरिकेत आणखी एक प्रोत्साहन पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे डॉलर आणखी बळकट होईल. अमेरिकन सरकार सुमारे २.४ ट्रिलियन डॉलर्सच्या प्रोत्साहन पॅकेजवर काम करत आहे. पुढील आठवड्यापर्यंत याची घोषणा देखील केली जाऊ शकते.