पुणे विमानतळावर १६ लाखांचे सोने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सीमाशुल्क अधिकाऱ्यांना चूकवून आपल्याजवळील वस्तूंची माहिती न देता थेट ग्रीन चॅनलमधून निघून जाणाऱ्या एका प्रवाशाला सीमा शुल्क विभागाच्या पथकाने पकडून त्याच्याकडून १६ लाख ७१ हजार रुपये किंमतीचे सोने जप्त केले आहे.

अब्दुर रहिम खातिब या प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अब्दुर स्पाईस जेटच्या दुबईहून आलेल्या विमानातून आज सायंकाळी लोहगाव विमानतळावर दाखल झाला. त्याने सीमाशुल्क अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता ग्रीन चॅनेल प्रवेशद्वारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अधिकाऱ्यांना त्याचा संशय आल्याने अब्दुरला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता १६ लाख ७१ हजार ९८३ रुपयांचे ६६४ ग्रॅम सोने बेकायदेशिरित्या बाळगल्याचे स्पष्ट झाले. सीमाशुल्क विभागाच्या नियमानुसार सोने जप्त करण्यात आले असून प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. ही कारवाई सीमा शुल्क विभागाचे सहआयुक्त के. आर. रामा राव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.