नाबाद ५० मधून साजरे होणार शाहीर परिषदेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

महाराष्ट्र शाहीर परिषदेला यंदा ५० वर्षे पूर्ण होत असून पुण्यात सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दिनांक १८ जून रोजी सकाळी ९ ते रात्री ८ यावेळेत गंज पेठ टिंबर मार्केटमधील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे स्मरणिका प्रकाशन, ज्येष्ठ शाहिरांचे सन्मान, व्याख्याने, बाल व महिला शाहिरांचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

राज्यभरातून तब्बल ४०० ते ५०० शाहीर यामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर दादा पासलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी कार्याध्यक्ष शाहीर प्रकाश ढवळे, काशिनाथ दिक्षीत, राजेंद्र आहेर, शितल कापशीकर, बाळासाहेब काळजे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, संजीव पालांडे, श्रीराम पांडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात संस्थेच्या ५० वर्षांची वाटचाल सांगणारी स्मरणिका प्रकाशित होणार आहे. यापूर्वी सकाळी ९ वाजता पोवाडे सादरीकरण होणार आहे.  दुपारच्या सत्रात संतसाहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.सदानंद मोरे यांचे संत वाङ्मय आणि मराठी शाहिरी याविषयावरील व्याख्यान दुपारी ४ वाजता होणार आहे. यावेळी राज्याचे समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, ज्येष्ठ उद्योजक पराग मते, राजर्षी शाहू बँकेचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे उपस्थित राहणार आहेत.  कार्यक्रमाचा समारोप सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी राज्यभरातील ज्येष्ठ शाहिरांचे सन्मान होणार असून जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जगदीश कदम, ज्येष्ठ उद्योजक भगवान पासलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील नागपूर, बुलढाणा, जळगाव, कोल्हापूर, सांगली, मुंबई, कोकण, पुणे जिल्हा अशा विविध भागातून शाहीर यामध्ये सहभागी होणार आहेत.