बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! 69 हजार रुपये पगार,जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   लॉकडाऊनमुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे लाखो तरुण नव्या नोकरीच्या आणि संधीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणा-या तरुणासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरलीस्ट अधिकारी पदाचा 150 जागा भरण्यात येणार असून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची आज (दि. 6) शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आजचा दिवस संपेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास 22 मार्चपासून सुरुवात झाली होती. या निवड झालेल्या उमेदवारांना 48 हजार 170 ते 69 हजार 810 रुपये दरमहा वेतन मिळणार आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी वयोमर्यादा ही 25 वर्षांपासून 35 वर्षांपर्यंत आहे. कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह पदवी प्राप्त उमेदवार यासाठी पात्र असतील. तसेच कुठल्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून सीए, आयसीडब्ल्यूए, सीएफए, एफआरएम सह 3 वर्षांच्या कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या भरती प्रक्रियेसाठी खुला, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गासाठी 1180 रुपये प्रवेश शुल्क आहे. तर एससी, एसटी उमेदवारांसाठी 118 रुपये एवढे प्रवेश शुल्क आहे. पीडब्ल्यूबीडी आणि महिलांसाठी निशुल्क अर्ज करता येईल. या भरती प्रक्रियेमधून पात्र उमेदवारांची निवड ही ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे होणार आहे.

या भरती प्रक्रियेत विविध प्रवर्गांसाठी राखीव असलेल्या जागा खालीलप्रमाणे.

खुला प्रवर्ग -62 जागा

ओबीसी – 40 जागा

एससी – 22 जागा

एसटी – 11 जागा

ईडब्ल्यूएस प्रवर्ग – 15 जागा