सरपंचाच्या पतीचा दबाव अन् ग्रामविकास अधिकार्‍याची आत्महत्या, प्रचंड खळबळ

0
121
gondia kurhadi gram panchayat gram vikas adhikari attempt suicide
Shivkumar Rahangdale

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन – सरंपच महिलेच्या पतीचा कामात हस्तक्षेप आणि दबामुळे त्रस्त झालेल्या कु-हाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान ग्रामसेवकाच्या बॅगेत एक सुसाईड नोट सापडली असून त्याआधारे पोलीसात तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सरपंचाच्या पतीला अटक केली आहे.

शिवकुमार चैतराम रहांगडाले (रा. आदर्श कॉलनी, गोरेगाव) असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. ते कु-हाडी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी सरपंच महिलेचा पती मार्तंड पारधी यास अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामसेवक रहांगडाले यांचा सरपंच अलका पारधी यांचे पती मार्तंड पारधी यांच्यासोबत वाद झाला होता. त्यानंतर 24 मार्चला रात्री घरी घेऊन विषारी औषध प्राशन केले. दोनदा उलटी केल्याने त्यांना गोंदिया येथे उपचारासाठी भरती केले. शिवकुमार यांची प्रकृती गंभीर होती. शुक्रवारी पत्नी अंतकला यांनी पतीची बॅग बघितली असता त्यांना शिवकुमार यांनी लिहिलेले पत्र आढळले. त्यात शिवकुमार यांनी गेल्या 1 वर्षांपासून सरपंचांचे पती मार्तंड पारधी ग्रामपंचायतच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याचे लिहिले आहे. चुकीचे बिल देऊन पैसे काढण्यासाठी प्रवृत्त करीत असून तसे न केल्यास वरिष्ठांकडे खोट्या तक्रारी करून खोटी कामे करण्यासाठी दबाव आणतात. त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे पत्रात नमूद केले आहे. प्रकृती गंभीर झाल्याने शिवकुमार यांना नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शिवकुमार यांनी लिहून ठेवलेल्या पत्राच्या आधारे त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दिली. गोरेगाव पोलिसांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतली. त्यानुसार सोमवारी मार्तंड पारधीला अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाकडे पोलिस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने पोलिस कोठडी न देता जामीन दिला. दरम्यान, मंगळवारी मृतदेह पोलिस ठाण्याच्या आवारात आणल्याने तणाव निर्माण झाला होता.