उमेदवाराची सटकली ; मतदान केंद्रातील ईव्हीएमच फोडलं

अनंतापूर (आंध्र प्रदेश) : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीकरता देशात पहिल्या टप्प्यामधील मतदान आज होत आहे. आंध्र प्रदेशातील जनसेना पार्टीच्या विधानसभा उमेदवाराने चक्क ईव्हीएम मशिनच जमिनीवर आदळून फोडली. मधुसुदन गुप्ता असं या उमेदवाराचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अनंतापूर जिल्ह्यातील गुटी मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर काही वेळ मतदान केंद्रावर गोंधळ उडाला.

आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभेसाठी एकत्रित मतदान होत असून, सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या आहेत. विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या जनसेनेच्या उमेदवारानं मतदान केंद्रात घुसून ईव्हीएम फोडले. मशिन सातत्याने बंद पडल्याच्या घटना घडत असल्याने ईव्हीएम मशिन बोगस असल्याचे सांगत रागारागात गुप्ता यांनी ईव्हीएम मशिन दोन हातांनी हातात घेऊन जोरात जमिनीवर आपटली. त्यामुळे ईव्हीएम मशिन खराब झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ मधुसुदन गुप्ता यांना अटक केली आहे. मात्र, या घटनेनंतर मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

आंध्रप्रदेशमध्ये १०० ईव्हीएम खराब –

लोकसभा निवडणुकीकरता देशात पहिल्या टप्प्यामधील मतदान आज होत आहे. लोकसभेच्या ९१ जागांकरता हे मतदान होत आहे. यामध्ये राज्यातील सात लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. दरम्यान, आंध्रप्रदेशमध्ये १०० ईव्हीएम खराब झाली. त्यामुळे मतदान ठप्प झालं आहे.