चांगली बातमी ! लासलगावमध्ये 8 दिवसाच्या चिमुकल्यासह 21 जणांची ‘कोरोना’वर मात

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेले एकवीस कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज देण्यात आल्याने या कोविड सेंटर मधून कोरोना मुक्त होत घरवापसी करण्याची संख्या शंभरी पार झाली असून यावेळी आठ महिन्यांचा तर अवघ्या आठ दिवसाच्या चिमुकल्याला ही घरी सोडण्यात आले

यावेळी नाशिकचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अनंतराव पवार, लासलगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. सुर्यवंशी, लासलगाव येथील कोरोना कोव्हीड रूग्णाचे उपचार केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम शेंद्रे , लासलगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ बाळकृष्ण अहिरे, प्रमुख आरोग्य सेविका सौ सविता जाधव व पाटेकर, सिस्टर दिलीप जेउघलेऔषध विभागाचे विजयकुमार पाटील, राजू जाधव, गणेश भवर, प्रकाश गुळवे, शिंदे मामा, ज्ञानेश्वर शिंदे, दत्तू शिंदे, संतोष निर्भवने, घनश्याम माठा आदि उपस्थित होते.

निफाड तालुक्यातील आठ गावातील एकवीस जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लासलगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते आज दुपारी जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी अनंत पवार यांच्या उपस्थितीत लासलगाव येथील 01, धारणगाव 04, निफाड 03, ओझर 04, भुसे 01, मरळगाई – 01, शिवडी 03 तर पिंपळगाव बसवंत येथील 04 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने या कोरोनामुक्त झालेेल्या रुग्णांना डिस्चार्ज देतांना वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आरोग्य विभागाचेे कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी करत टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.

यावेळी आठ महिन्याच्या चिमुकल्याला तर शिवडी येथील कोरोनाने सासूच्या निधनानंतर गर्भवती सुनेचा ही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला त्या रात्री या महिलेने एका गोंडस चिमुकल्याला जन्म दिला या आठ दिवसाच्या चिमुकल्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज दिल्याने लासलगाव कोविड सेंटरमधून आतापर्यंत 110 कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी लासलगाव कोविड सेंटरमधील आरोग्य विभागाच्या सर्व टीमचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका रुग्णाने दोन एलईडी लाईट तर एका खाजगी डॉक्टर रुग्णाने पाच पाण्याचे जार भेट दिले.