मोठा दिलासा ! पुण्यातील 5 जण ‘कोरोनामुक्त’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. कोरोना बाधित झालेले पहिले ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यातील पहिल्या दोघांना आज घरी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर आणखी तिघांचा उद्या दुसरी चाचणी नकारात्मक आली की त्यांनाही उद्या घरी सोडण्यात येणार आहे.

पुण्यात सर्वप्रथम ९ मार्च रोजी पहिले दोन जण कोेरोना बाधित आढळून आले होते. त्यांचे १४ दिवस पूर्ण झाल्याने त्यांचे सॅम्पल घेण्यात आले होते. ते निगेटिव्ह आले. त्यानंतर मंगळवारी दुसर्‍यांदा सॅम्पल घेण्यात आले. तेही पुन्हा निगेटिव्ह आले. त्यामुळे त्यांना आज बुधवारी घरी सोडण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी ही माहिती दिली आहे.

त्याचबरोबर १० मार्च रोजी ३ जण कोरोना बाधित आढळून आले होते. त्यांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्यांचे काल १४ दिवस पूर्ण झाल्याने त्याचे पहिले सॅम्पल घेण्यात आले. त्याचा अहवाल रात्री आला असून तो निगेटिव्ह आहे. त्यानंतर आता आज पुन्हा त्यांचा सम्पल घेण्यात येईल. तोही निगेटिव्ह आला की त्यांना उद्या घरी सोडण्यात येणार आहे.  या रुग्णांना घरी सोडण्यात येणार असले तरी त्यांना घरीच राहण्यास सांगण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण देशात लॉक डाऊन लागू करण्यात आल्याने त्यांना घरीच राहावे लागणार आहे.