Pune News : बारामती तालुक्यात पहिल्या टप्प्यात 3500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण – डॉ. खोमणे

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन –  देशात कोरोना लसीकरणासाठी शनिवार (दि. 16) पासून सुरुवात होणार आहे. त्यानुसार बारामती शहर व तालुक्यातील खासगी तसेच शासकीय सुमारे 3 हजार 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. प्रत्येक दिवसाला 300 ते 400 जणांना कोरोनाची लस देण्यात येणार असून आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत बारामती मधील लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण होणार असल्याचे डॉ. खोमणे यांनी सांगितले.

राज्य व केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 5 पथके तयार केली आहेत. यात 1 व्हॅक्सीनेटर (प्रत्यक्ष लस देणारा) सोबत 4 सहकारी असणार आहेत. तालुक्यातील 1 हजार 278 शासकीय आरोग्य कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील 2 हजार 200 आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड अ‍ॅपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती. या सर्व कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. करण्यात येणार आहे.

रूई येथील शासकीय महिला रूग्णालय व सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची तयारी केली आहे. यासाठी लसीकरण कक्ष उभा केला आहे. यामध्ये प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्षाची निर्मिती केली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पोलीस , होमगार्ड, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, शिक्षक,अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांना लस दिली जाणार आहे. तर पुढील तिसऱ्या टप्प्यात साठ वर्षा पुढील व्यक्तींना तसेच मधुमेह व रक्तदाब असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यासाठी योग्य वेळी सूचना देण्यात येतील असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले.