खुशखबर ! भारतामध्येच होणार ‘कोरोना’ची लस तयार

बंगळूर, वृत्तसंस्था – कोरोनावर भारतातच प्रतिबंधक लस निघणार याची शक्यता नाकारता येत नाही. याला दुजोरा बंगळुरातील बायोकॉन कंपनीचे प्रमुख किरण मजुमदार शहा यांनी दिला आहे. कोरोना नियंत्रणासाठी भारतातच लस तयार करण्यात येत असून या वर्षातच ती उपलब्ध होईल, असेही त्या म्हणाल्या. तीन ते चार छोट्या कंपन्या एका मोठ्या कंपनीच्या सहकार्याने कोरोना विषाणूवर लस विकसित करण्याच्या कामात गुंतल्या आहेत. लवकरच यात यश येईल, यावर आमचा विश्वास आहे. लस तयार झाल्यानंतर जनतेत विश्वासाची भावना निर्माण होईल.

या रोगावर औषध आल्याचे समजल्यास सामान्य जनतेचा या रोगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. बायोकॉन कंपनीही औषध निर्मितीच्या कामात सहभागी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्लाझ्मा थेरपीबाबत त्या म्हणाल्या, “प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्याची भारतात काही उदाहरणे आहेत. १९१८ च्या स्पॅनिश तापासाठी प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली. तसेच कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांच्या रक्त संकलनाच्या विषयावर मी काही राज्यांशी चर्चा केली आहे. कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त मानली जाते. राष्ट्रीय पातळीवरील लॉकडाउन, विलगीकरणाची प्रणाली कोरोनाच्या प्रसारावर अंकुश ठेवण्यास उपयुक्त ठरली आहे. देशात व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. देशातील ९० टक्के जनता ६० वर्षाच्या आतील असून कोरोनामुळे मृत झालेल्या ८० टक्के व्यक्‍ती ६० वर्षापेक्षा अधिक वयाच्या आहेत.” असेही मुजुमदार म्हणाल्या.

एकंदरीतच भारताचे लस शोधून काढण्याचे प्रयत्न यशस्वीपणे वाटचाल करीत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.