खुशखबर…! सोन्या-चांदीच्या दरात घट

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा दर वाढल्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाल्याचे दिसून येत आहे. सोन्याच्या दरात ११०० रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या २८ फेब्रुवारीला ३३९०० रुपयांवर पोहचलेला सोन्याचा दर आज ३२८०० वर येऊन पोहचला आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. चांदीच्या दरात १५०० रुपयांची घसरण झाली आहे.

केवळ दागिने म्हणून नाही तर गुंतवणूक म्हणून देखील सोन्याचा पर्याय निवडला जातो. आता सोन्याचा दर कमी झाल्यामुळे सोने खरेदीला वेग येईल असे तज्ञांचे मत आहे. दरम्यान दसरा दिवाळी पासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत होती मात्र त्यानंतर आता सोन्याच्या दरात घाट झाली आहे. ऐन लग्नासराईत सोन्याचा दर कमी होणे ही सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता आहे.

कशी कराल खऱ्या दागिन्यांची पारखं

आजकाल खऱ्या दागिन्यांच्या सोबतच इमिटेशन ज्वेलरी किंवा नकली दागिने देखील बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. सोन्या-चांदीच्या किंवा इतर मौल्यवान रत्नांनी बनलेल्या दागिन्यांची खरेदी आपण शक्यतो आपल्या ओळखीतील आणि खात्रीशीर जव्हेऱ्यांकडेच करीत असतो. तरी अनकेदा चोख दागिना देण्याच्या बहाण्याने नकली दागिने किंवा रत्ने दिल्याच्या घटना सर्रास घडताना आपण ऐकत असतो. एखादा दागिना घ्यायचा झाला, तर त्यासाठी आपल्या मेहनतीचे पैसे आपण मोजत असतो, त्यामुळे इतके पैसे खर्च करून विकत घेतलेला जिन्नस चोख असावा ही आपली अपेक्षा योग्यच असते. आपण घेत असलेला दागिना चोख आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी काही पर्याय अवलंबता येतील.

दागिना खरेदी करताना सर्वात आधी त्यावर ‘हॉलमार्क’ किंवा आपण ज्यांच्याकडून दागिना खरेदी करीत आहोत त्यांचा ट्रेडमार्क त्यावर असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच दागिना ज्या धातूने बनलेला आहे, त्याची शुद्धता देखील या ट्रेडमार्कमध्ये अंकित असते. दागिन्यामध्ये चोख धातूची मात्र जास्त असल्यास हा दागिना लोहचुंबकाला पटकन चिकटणार नाही. पण धातूमध्ये इतर कमी दर्जाच्या धातूची भेसळ असल्यास तो धातू लोहचुंबकाला पटकन चिकटतो. सोन्याची पारख करताना दागिना ‘अनग्लेझ्ड’ टाईलवर घासून पाहिल्यास टाईलवर सोनेरी डाग येतील. जर सोने शुद्ध नसेल, तर टाईल वर उठणारे ओरखडे राखाडी किंवा काळसर रंगाचे दिसतात. सोने चोख आहे किंवा नाही हे पाहण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे व्हिनेगर. व्हिनेगर दागिन्यावर टाकले असता, दागिन्यातील सोने चोख नसेल, तर दागिना लगेच काळा पडल्याचे दिसून येते.

हातात घातलेली चांदीची अंगठी जर शुद्ध चांदीची असेल, तर जिथे त्या दागिन्याला सतत पाणी, तेल किंवा इतर तत्सम पदार्थ लागत असेल, तेथील त्वचा निळसर दिसू लागते. तसेच चांदीच्या जिन्नसावर खडू घासला असता, जर चांदी शुद्ध नसेल, तर ज्या ठिकाणी खडू घासला आहे तो भाग त्वरित काळा पडू लागतो. त्यावरून दागिन्यातील चांदी शुद्ध असल्याचे समजू शकते. प्लॅटीनम चांदी प्रमाणेच शुभ्र दिसते. याचा दागिना चोख आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी अमोनियाचा वापर करता येतो. अमोनियाचे काही थेंब दागिन्यावर टाकले असता, धातू चोख नसल्यास तो त्वरित काळा पडतो.

तारीख सोने प्रतितोळा चांदी प्रतिकिलो

– 28 फेब्रुवारी 33900 41500
– 1 मार्च 33700 41500
– 2 मार्च 33500 41500
– 3 मार्च 33300 41500
– 4 मार्च 33300 41500
– 5 मार्च 33100 41500
– 6 मार्च 32900 41000
– 7 मार्च 32800 41000
– 8 मार्च 33500 41500
– 9 मार्च 33500 41500
– 10 मार्च 32800 40000

ह्याहि बातम्या वाचा –

प्रकाश आंबेडकरांनी सांगितले शरद पवारांच्या माघारीचे ‘खरं’ कारण

लोकसभा निवडणुकीत गाजणार ‘हे’ सहा मुद्दे

मनमोहन सिंग पंजाबमधून लोकसभा लढवणार ?

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचं डोकं फिरलंय ; पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे शिवीगाळ