CKP बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर ! अडकलेले पैसे आता परत मिळण्यास झाली सुरूवात, जाणून घ्या

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे 30 एप्रिल 2020 रोजी सीकेपी बँकेचा परवाना रद्द केल्यामुळे बँकेच्या ग्राहकांना धक्का बसला होता कारण त्यांचे पैसे बँकेत अडकले होते. परंतु आता त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठेवी विमा महामंडळाकडून त्यांचा एफडी रिफंड मिळणार आहे.

महामंडळाच्या नव्या सुधारित नियमांचा फायदा बँकेच्या ग्राहकांना होताना दिसत आहे. त्यानुसार एफडी व्याज किंवा 5 लाख रुपये यामधून जी काही रक्कम कमी असेल तेवढी ग्राहकांना देण्यात येईल. महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स महासंघाने ही माहिती दिली आहे.

सीकेपी बँकेत एफडीमध्ये गुंतवणूक करणारे वैयक्तिक ग्राहक किंवा संयुक्त ग्राहक त्यांच्या पैशाच्या प्राप्तीसाठी ठेवी कॉर्पोरेशनच्या नियमांच्या तरतुदीनुसार, त्यांच्या पैशाचा दावा करु शकतात. यासाठी त्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. पैसे मिळविण्यासाठी, त्यांना पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे यासारख्या पुराव्यांसह बँकेच्या विहित नमुन्यात सबमिट करावे लागेल.

सीकेपी बँकेने ग्राहकांना पोस्ट पाठविली आहे. एका वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ज्यांना हा फॉर्म मिळालेला नाही ते बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन घेऊ शकतात. याशिवाय बँकेच्या www.ckpbank.net या संकेतस्थळावरही फॉर्म उपलब्ध आहेत. महाराष्ट्र नगरी सहकारी बँका महासंघाने प्रेस नोटद्वारे ही माहिती दिली आहे.