‘कर्जमाफी’ मिळाली नसलेल्या शेतकऱ्यांना ‘खुशखबर’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली आहे. शेतकऱ्यांना फक्त कर्जमुक्त न करता येत्या खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्याला कर्जपुरवाठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नाही. त्यांना देखील कर्जपुरवठा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिली आहे. तसेच या योजनेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या मुख्यालयात मोबाईल व्हॅन सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमानंतर राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अनिल कवडे यांनी प्रशासक कालावधीत सोलापूर जिल्हा बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीचेही कौतुक केले.

अनिल कवडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, शासनाकडून विशेषत: सहकार विभागाकडून सर्वसामान्यांना गतिमान कारभार आणि पारदर्शकता अपेक्षित आहे. त्यांची ही अपेक्षा सहकार विभाग पूर्ण करेल. नागरिकांना ऑनलाइन सेवा जास्तीत जास्त देण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर सहकार विभागाकडून करण्यात येणार आहे. तसा प्रयत्न राहणार असल्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सांगितले.