मुंबईच्या महिलांसाठी खुशखबर ! उद्यापासून सुरू होणार उपनगरीय ट्रेन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   उद्यापासून (ता. २१) सर्व महिला प्रवाशांना सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान व सायंकाळी 7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. याबाबत पियुष गोयल यांनी टि्वट केल आहे.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकार सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देणार असल्याचं एक परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. पण रेल्वे बोर्डानं असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केल्याने हा मुहूर्त लांबणीवर पडला होता. आता केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अधिकृतरीत्या रेल्वेमध्ये महिलांना प्रवासास मुभा दिली आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लोकल प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असताना रेल्वेकडून मात्र आता वेळकाढूपणा केला जात आहे. नवरात्रीत मायभगिनींना लाभ झाला नसता का? रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईच्या महिलांना उत्तर द्यावं, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती.

त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत असल्याचं म्हणत महिलांच्या लोकल प्रवासांच्या विलंबाचा चेंडू रेल्वेमंत्र्यांनी ठाकरे सरकारकडे टोलवला आहे.

रेल्वे बोर्डाची परवानगी आधीच का घेतली नाही? याचे उत्तर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईच्या महिलांना दिले पाहिजे, असं आव्हानच सचिन सावंत यांनी पीयूष गोयल यांना केलं होतं.