मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! सर्व सामान्यांसाठी 8 जून पासून ‘बेस्ट’ धावणार

मुंबई : मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्व सामान्यांचे जनजीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी बेस्टने कंबर कसली असून उद्या सोमवारपासून बेस्टच्या बसगाड्या सर्वसामान्यांसाठी धावण्यास सुुरुवात होणार आहे.

लॉकडाऊनमध्ये बेस्टच्या फेर्‍या केवळ मंत्रालय व अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी सुरु होत्या. सुमारे दीड हजार बसच्या फेर्‍या सध्या सुरु आहेत. सोमवारी त्यात २३०० पर्यंत वाढ करण्यात येणार आहे.

या बसमध्ये प्रत्येक सीटवर एका प्रवाशाला बसण्यास परवानगी असेल व पाच जण उभे राहून प्रवास करु शकणार आहे. प्रवाशांनी भरभरुन वाहणार्‍या बेस्टच्या बसगाड्या पाहण्याची सर्वांना सवय आहे. मात्र, कोरोनाच्या संकटात जनजीवन पुन्हा सुरु करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून बसगाड्या व एस टीची वाहतूक सुरु करण्यात येत आहे. सोमवारी २ हजार ३०० फेर्‍या होणार असून त्यानंतर त्या साडेतीन हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.