साईंच्या भक्तांसाठी खुशखबर ! आगामी 2 महिन्यात शिर्डी विमानतळावर नाईट लाँडिंग होणार सुरू

मुंबई : एमएडीसीच्या संचालक मंडळाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीत शिर्डी विमानतळावर येत्या दोन महिन्यात नाईट लँडिंगची सोय त्याचबरोबर कोल्हापूर येथे नाईट लँडिंगची सोय होण्यासाठी ६४ एकर भूसंपादन व अमरावती विमानतळावर पॅसेंजर टर्मिनस व हवाई वाहतूक टॉवर उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे ५० कोटी रुपयांची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ लवकरात लवकर सुरू करा, असे निर्देश दिले आहेत एकूणच बैठकीतील निर्णयामुळे राज्यातील हवाई क्षेत्राचे रुपडे बदलणार आहे.

बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानचालन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिर्डी विमानतळावरून २५ मार्चला कार्गो विमानसेवा सुरु झाली आहे. मात्र साईंच्या काकड आरतीला उपस्थित राहता यावे यासाठी येथे नाईट लँडिंगची सोय उपलब्ध करावी अशी मागणी भक्तांनी केली होती. त्यानुसार या बैठकीत इंडियन मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंटला नाईट लँडिंगची साधने बसविण्याची परवानगी मागितली असून ती मिळताच दोन महिन्यात त्या ठिकाणी नाईट लँडिंगची सोय होईल, अशी माहिती देण्यात आली.

अलायन्स एअर कंपनीने अमरावती येथून प्रवासी विमानसेवा सुरू करण्याची तयारी दाखविली आहे. दीपक कपूर यांनी विमानतळांच्या विकासासाठी गेल्या तीन महिन्यात केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय आणि रोजगार संधी चिपी विमानतळामुळे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे विमानतळ लवकर कार्यान्वित व्हायला हवे. विमानतळावरील धावपट्टीच्या कामाबाबत डीजीसीएने अहवाल दिला आहे. त्या निकषानुसार वेळेत धावपट्टीचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. निश्चित अशा कालमर्यादेत काम पूर्ण होण्यासाठी विमानतळ विकास कंपनी, एमआयडीसी यांनी समन्वयाने प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले.