शिक्षकांसाठी गूड न्यूज, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार भरघोस अनुदान

मुंबई : वृत्तसंस्था – राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरकारनं गूड न्यूज दिली आहे. राज्यातील जवळपास ३० हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करण्यात येणार असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले आहेत. अर्थसंकल्पात पावणे तीनशे कोटींची तरतूद यासाठी केली जाणार आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत केलेल्या उपरोक्त घोषणेचा लाभ राज्यातील ३० हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये उपरोक्त बाबींची सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संबंधीची तरतूद करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही विनोद तावडे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले. तसेच खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध अधिवेशन संपल्यानंतर पुढील 15 दिवसांत मंत्रिमंडळाच्या मान्यतेकरिता सादर करण्याची देखील घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार, शिक्षक परिषदेचे अध्यक्ष आदींची बैठक आज विधानभवनात पार पडली. यावेळी गृहराज्यमंत्री रणजित पाटील उपस्थित होते. यावेळी शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांनी शिक्षकांची वास्तव बाजू बैठकीत मांडली.