Coronavirus : दिलासादायक ! ‘कोरोना’चा हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावात 440 पैकी 439 रूग्णांचा रिपोर्ट आला ‘निगेटिव्ह’

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन  –  नाशिक जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव मधून एक गुड न्यूज आहे. येथील ४४० संशयित रुग्णांपैकी ४३९ जणांचा कोरोना संसर्ग अहवाल निगेटिव्ह आलायं. तसेच आनंदाची गोष्ट म्हणजे आधीच्या ४ कोरोना संसर्गित रुग्णांचा अहवाल देखील उपचारानंतर निगेटिव्ह आला आहे.

कोरोना संसर्ग मुक्त झालेल्या या रुग्णांना सोमवारी सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, कोरोना संसर्गावर मात करणाऱ्या ३ रुग्णांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. हॉटस्पॉट क्षेत्र असलेल्या मालेगावात दोन दिवसांत ७ रुग्णांनी धोबीपछाड दिल्याने तसेच ४३९ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे नागरिक व प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंग यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, मनपा अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बऱ्या झालेल्या रुग्णांना मंसुरा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तसेच सर्वांनी कोरोना संसर्ग मुक्त झालेल्या रुग्णांवर फुलांचा वर्षाव केला.

यावेळी मंत्री दादा भुसे यांनी आवाहन केलं की, रुग्ण कोरोना संसर्ग मुक्त होऊन घरी जात आहे. त्यामुळे कोरोना संसर्गावर मात करता येऊ शकते, हे स्पष्ट झालायं. म्हणून कोरोना संसर्गाचे लक्षण असणाऱ्यांनी तपासणीसाठी पुढं यावे.

उपचारामुळे आणखी अनेक रुग्ण निगेटिव्ह झाले असून आगामी काळात मालेगाव कोरोना संसर्ग मुक्त होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी व्यक्त केला. पोलीस हे जवानांसारखे लढत आहे जवानांसमोर शत्रू असतो. मात्र पोलीस हे कोरोना संसर्गासारख्या अदृश्य शत्रूसोबत युद्ध करत असल्याचे ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख प्रमुख आरती सिंग यांनी सांगितले.