जुलै महिन्यात येणार ‘कोरोना’वर औषध ? ‘ही’ प्रसिद्ध कंपनी करणार मनुष्यावर ‘प्रयोग’

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था –  औषध उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य अमेरिकन कंपनी असणाऱ्या Johnson & Johnson ने कोरोनावर औषध सापडल्याचा दावा केला आहे. या औषधाच्या मानवी चाचण्या जुलै महिन्यात घेण्यात येतील असा दावा देखील कंपनीने केला आहे. यासाठी कंपनीने अमेरिकन सरकारकडे परवानगीही मागितली आहे. तसेच कंपनीने अमेरिकन सरकारसोबत एक करार केला असून औषध सिद्ध झालं तर कंपनी तब्बल 1 लाख बिलियन डोसेस तयार करणार आहे.

Johnson & Johnson कंपनीने हा प्रयोग अमेरिका आणि बेल्जियममध्ये करणार असून यासाठी 1045 जणांची निवड करण्यात आली आहे. त्यात 18 ते 65 या वयोगटातील माणसं निवडण्यात आली आहेत. जगभरात सध्या 10 कंपन्यांनी औषध शोधण्यात प्रगती केल्याचा दावा केला आहे. औषध शोधून त्याच्या मानवी चाचण्या सुरु केल्यानंतरही नियमित प्रक्रियेनुसार त्या औषधाचा शरीरावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी साधरण 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागतो. यात आता सूट दिली जाणार आहे. सुरुवातीच्या अभ्यासानंतर त्यात यश मिळालं आणि त्याचे दुष्परिणाम आढळून आले नाही तर हे औषध कोरोना रुग्णांना दिलं जाऊ शकतं.

कोरोना व्हायरस जगाच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत सापडली आहेत. करोना रुग्णांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर असून भारताचा सहावा क्रमांक लागतो. जगात असा एकही देश नाही ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. मात्र, कोरोनाच्या या संकटात अद्यापही स्वित्झर्लंड सुरक्षित देश आहे.

पहिल्या श्रेणीत जगातील सर्वात सुरक्षित 20 देशांचा समावेश आहे तर चौथ्या श्रेणीत सर्वाधिक धोका असलेले म्हणजे सर्वाधिक असुरक्षित देश आहेत. पहिल्या श्रेणीत स्वित्झर्लंड सर्वात आघाडीवर आहे. स्वित्झर्लंड हा जगातील सर्वात सुरक्षित देश असल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. तर सर्वात जास्त धोका असलेल्या तिसऱ्या श्रेणीत भारताचा समावेश आहे. या यादीत भारत 56 व्या क्रमांकावर आहे. सुदान हा सर्वात असुरक्षित देश असून सर्वात शेवटी म्हणजे 200 व्या स्थानी आहे.